आदर हा मागितल्याने मिळत नाही, तो स्वत:च्या वागणुकीने कमवावा लागतो आणि एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही.. त्यामुळे वर्तन आणि वक्तशीरपणा या दोनच गुणवैशिष्टय़ांवर जग जिंकता येते, असे इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक भिडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ३७ वर्षे अध्यापन, राष्ट्रीय छात्रसेनेचे २३ वर्षे संलग्न अधिकारी आणि ५० वर्षांपासून उत्तम बॅडमिंटनपटू असलेल्या स्वॉड्रन लिडर (निवृत्त) प्रो. अशोक व्ही. भिडे यांना येत्या १५ जुलैला वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे.
विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्राच्या कामगिरीचे पाच दशकांचे साक्षीदार आणि विद्यार्थी वर्तुळात ‘भिडे सर’ म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेल्या प्रो. भिडे यांच्याशी वर्तमान शैक्षणिक स्थिती, पालकांची मानसिकता आणि छात्रसेनेची वर्तमान प्रगती याबाबतची स्थिती जाणून घेण्याच्या निमित्ताने संवाद साधला असता त्यांनी छात्रसेनेकडे विद्यार्थ्यांचा कल राहिलेला नसल्याची खंत व्यक्त करतानाच ‘आदर हा मागून मिळत नाही, तो शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनात स्वत:च्या वागणुकीने निर्माण करावा लागतो’, असा गुरुमंत्र दिला.
भारतीय सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या अशोक भिडे यांना प्राध्यापकाचा पेशा स्वीकारावा लागला. परंतु, लष्करी गणवेशाचे आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. अचानक त्यांना १९६९ साली राष्ट्रीय छात्रसेनेत संलग्न छात्रसेना अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने हे स्वप्न पूर्ण झाले. त्यांचा निवृत्तपर्यंतचा कार्यकाळ कडक शिस्तीचा अधिकारी आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून गणला गेला. नंबर २ महाराष्ट्र एनसीसी एअर विंगमध्ये संलग्न अधिकारी (एएनओ) म्हणून काम करताना त्यांच्या काळात कॅप्टन चाफेकरांच्या मार्गदर्शनात शेकडो छात्रसैनिक तयार झाले. त्यापैकी काहीजण आज भारतीय सैन्यदलात एअर कमोडोर, ग्रुप कॅप्टन, कर्नल अशा हुद्दय़ापर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र, साधारण २००० नंतर एन.सी.सी.ची स्थिती बदलल्याची खंत त्यांना आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकच आज दुर्मिळ झाले असल्याने छात्रसेनेकडे विद्यार्थ्यांचा कल राहिलेला नाही, असे परखड मत प्रो. भिडे यांनी व्यक्त केले.
प्राध्यापक आणि एन.सी.सी. अशा दोन्ही क्षेत्रात अनेक वर्षे काढताना त्यांना नागपूर विद्यापीठाच्या हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करण्याचीही संधी मिळाली. त्यांच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून विदर्भाचे अनेक रणजीपटू घडलेले आहेत. वक्तशीरपणा, शिस्तीची कोणतीही तडजोड केली नाही. सोपविलेल्या कामाप्रती निष्ठा ठेवली आणि या वैशिष्टय़ांच्या भरवशावर आजवरचे आयुष्य जगलो. एन.सी.सी.त एकदाही परेड चुकविली नाही. बॅडमिंटनची सकाळी ६ ची वेळ गेल्या ५० वर्षांपासून चुकलेली नाही. खेळाडूंच्या सरावाच्या वेळी कधीही गैरहजर राहिलेलो नाही, त्यामुळेच विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देऊ शकलो, असे गमक त्यांनी सांगितले.
कडक शिस्तीने विद्यार्थी बावचळतात हा गैरसमज आहे. उलट वेळेचे महत्त्व त्यांना पटल्यानंतर ते स्वत:च वेळ पाळू लागतात. यासाठी शिक्षकाने स्वत: सजग असणे आवश्यक आहे. सोपविलेल्या कामाची पूर्तता वेळच्या वेळी करणे हा माझा धर्मच होता आणि तो पार पाडल्याचे आत्मिक समाधान मिळालेले आहे. काम आटोपून घरी आल्यानंतर शांत झोप लागली तरच तो दिवस चांगला गेला असे समजावे, असेही भिडे यांनी सांगितले. छोटय़ा छोटय़ा अपयशाने खचून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना भिडे म्हणाले, पालकांचा वाढता दबाव विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. एखाद्या अभ्यासक्रमाकडे त्याचा कल नसेल तर त्याच्यावर अपेक्षांचे ओझे लादणे चुकीचे आहे. टीव्ही, मोबाईल, इंटरनेटमुळे आज विद्यार्थी मैदानावर येत नाहीत. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तोच कुठेतरी संपलेला आहे. विद्यार्थी चुकीच्या मार्गाला वळू लागले आहेत. परंतु, अख्खी नवी पिढी तशी आहे, असे मी म्हणणार नाही. पण, त्यांना पालक आणि शिक्षकांचा धाक आवश्यक आहे. आपला पाल्य बाहेर काय करतो, याची माहिती पालकांना नसते. त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांची घडण होणे निव्वळ अशक्य आहे, असे समीकरण त्यांनी मांडले.