आज राष्ट्रीय विज्ञानदिन
आपल्या आयुष्यावर ग्रह आणि राशींचा परिणाम होतो का?.. ४१.५ टक्के तरुणांच्या मते काही प्रमाणात परिणाम होतो! आपल्या नावाचे स्पेलिंग बदलल्याने यशापयशात कितपत फरक पडतो?.. १५ टक्के तरुणांच्या मते थोडासा फरक पडतो! परीक्षेत नापास होण्याची कारणे काय असू शकतात?.. ९ टक्के तरुणांच्या मते पुरेसा अभ्यास न होण्याबरोबरच देवावर श्रद्धा नसल्यानेही विद्यार्थी परीक्षेत नापास होऊ शकतो! विज्ञानदिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने तरुणांना विचारलेले हे प्रश्न आणि ही त्यांची उत्तरे! तरुणाईच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारी! थोडक्यात विद्येच्या या माहेरघरातील तरुणाई ग्रहदशेवर असलेला विश्वास वगळता विज्ञाननिष्ठ आहे असे दिसून येते.
पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत ही पाहणी करण्यात आली. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होण्याचे कारण त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नसतो यावर ८९ टक्के तरूण ठाम आहेत. दीड टक्का तरूण म्हणतात की देवावर श्रद्धा नसल्यामुळेच विद्यार्थी नापास झाला असावा! तर ९ टक्के तरुणांना हे दोन्ही पर्याय पटले आहेत. तसेच ५२ टक्के जणांच्या मते आपल्या जीवनावर ग्रह-राशींचा अजिबात परिणाम होत नाही. ४१.५ तरुणांच्या मते काही प्रमाणात परिणाम होतो. तर ग्रह-राशींचा जीवनावर भरपूर परिणाम होतो असे म्हणणारेही ६ टक्के जण आहेत. एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडण्यासाठी ६ टक्के तरुणांच्या मते व्यक्तीची ग्रहदशा किंवा साडेसाती सुरू असणे कारणीभूत आहे. ४.६ टक्के जण करणी किंवा ब्लॅक मॅजिकमुळे मानसिक संतुलन बिघडते असे म्हणतात. तर ८९ टक्के तरूण मानसिक संतुलन बिघडण्याचा संबंध ताणतणावाशी असू शकेल असे म्हणत आजाराचे वैज्ञानिक कारण शोधू पाहतात. ८० टक्के तरुणांच्या मते संख्याशास्त्राचा (न्युमरॉलॉजी)वापर करून आपल्या नावाचे स्पेलिंग बदलण्याचा यशापयशाशी काहीही संबंध नसतो. १५ टक्के जण स्पेलिंग बदलल्याने यशापयशात थोडासा फरक पडत असल्याचे सांगतात तर ४.६ टक्के तरुणांच्या मते स्पेलिंग बदलल्याने भरपूर फरक पडतो!
उपग्रहाची प्रतिकृती बालाजीला अर्पण करण्याची प्रथा तरुणांना नवीनच !
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’तर्फे उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तिरूपती बालाजीला अर्पण केली जाते. ही माहिती बहुसंख्य तरुणांना नवी होती. यावर ४० टक्के तरु णांनी ही अंधश्रद्धाच असल्याचे मत व्यक्त केले. ६ टक्के तरूण असे करणे योग्य असल्याचे मानतात. तर ५३.८ टक्के तरुणांच्या मते उपग्रहाबाबतच्या इतर आवश्यक बाबी शास्त्रज्ञांनी तपासल्या असतील तर त्याची प्रतिकृती बालाजीला अर्पण करण्यात काहीच हरकत नसावी.