हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वरदविनायक गॅस एजन्सीने नावडे नोडमध्ये घरपोच सिलेंडर न दिल्याने गृहिणींना सिलेंडर उचलून नेण्याची शिक्षा ‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर समाप्त झाली आहे. १ तारखेपासून सिलेंडर घरपोच करण्यात येणार आहे, असा निरोप या एजन्सीचे कर्मचारी एचपीच्या गॅसधारकांना घरी सिलेंडर देताना पोहोचवत आहेत. ‘लोकसत्ता’ची बातमी आली नि गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली चुकीची प्रथा बंद पडल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे नावडे नोडमधील महिलांनी श्रमाच्या या कचाटय़ातून सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नावडे नोडमध्ये याआधी श्री पावशा इमारतीसमोरील रस्त्याकडेला एचपी कंपनीचा सिलेंडरने भरलेला रिक्षाटेम्पो उभा केला जात होता. गॅसधारकांनी बुकिंग सिलेंडर याच टेम्पोतून घेऊन जाण्याची प्रथा पडली होती. याबाबत वरदविनायक गॅस एजन्सीकडे ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून तक्रार झाल्यावर गृहिणींच्या घरी लागलीच घरपोच सिलेंडरचा निरोप धाडण्यात आला. या चुकीच्या प्रथेमुळे ज्यांचा घरगुती सिलेंडर संपलाय अशा कुटुंबातील महिलेसोबत शेजारच्या महिलेला या सिलेंडरचे ओझे उचलावे लागत होते. या निर्णयामुळे शंभर गॅसधारकांनी वरदविनायकची चुकीची प्रथा बंद पडल्याने समाधान व्यक्त केले आहे.