महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन बहिस्थ विभागप्रमुखाला सहा महिने साधी कैद आणि दीड हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या दंडापैकी एक हजार रुपये त्या महिलेस देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी दिला. १२ ते १३ एप्रिल २०१२ दरम्याने पुणे विद्यापीठातच हा प्रकार घडला होता.
बाळासाहेब श्रीपती हेंद्रे (वय ५५, रा. इंदिराशंकर हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी महिला या पुणे विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात शिपाई म्हणून कामाला होत्या. हेंद्रे याने घटनेच्या दिवशी सुटी असताना त्यांना कामावर बोलविले. तू माझ्याशी मैत्री करशील का, असे म्हणत तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर हेंद्रेला निलंबित केले होते. या खटल्यात सहायक सरकारी वकील ए. के. पाचरणे आणि फिर्यादीच्या वतीने एच. व्ही. डोईफोडे यांनी सात साक्षीदार तपासले. या गुन्ह्य़ाचा तपास सुनील ढाकणे यांनी केला.