सुधा मूर्तीची क था, नितीश भारद्वाजसारख्या संवेदनशील अभिनेत्याचे दिग्दर्शन, सचिन खेडेकरसारखा कसलेला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री तनुजा यांना अतिशय वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी असा एक सुंदर योगायोग इंडियन मॅजिक आय निर्मित ‘पितृऋण’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आलेली प्रत्येक गोष्ट चांगली असली तरी जवळजवळ ३५ वर्षांनंतर तनुजा यांचं मराठी चित्रपटात दिसणं तेही आपण कधी कल्पना करू शकणार नाही अशा रूपात त्यांना काम करताना पाहणं हा वेगळाच अनुभव ठरणार आहे. त्यामुळे आजवर चुलबुली, फटकळ, सडेतोड आणि अभिनेत्री म्हणून ग्लॅमरस भूमिकांमधून समोर आलेल्या तनुजा यांनी ‘पितृऋण’सारखा वेगळा विषय का निवडला असावा?, या प्रश्नावर ‘भूमिका’ हे एक ठाम उत्तर आपल्याला त्यांच्याकडून मिळतं.
‘मी पुस्तकं वाचत नाही. मराठी वाचता येत नाही. त्यामुळे सुधा मूर्तीची ही कथाही वाचलेली नाही. पण, नितीशने ज्या पद्धतीने ती कथा मला ऐकवली. चित्रपट म्हणून त्याच्या डोळ्यासमोर जे होतं ते त्याने इतक्या सुंदर पद्धतीने माझ्यासमोर मांडलं आणि ते मला आवडलं’, असे तनुजा सांगतात. चित्रपटातील भूमिकांसाठी खरोखरच आपलं डोकं भादरून घेण्याचा प्रकार याआधीही शबाना आझमी, लिझा रे, नंदिता दास, सविता मालपेकर अशा अनेक अभिनेत्रींनी केलेला आहे. पण, पांढऱ्या आलवणातील तनुजा यांना शुद्ध मराठीत बोलताना आपण आजवर पाहिलेले नाही. पण, त्या सगळ्या तपशिलांविषयी न बोलता त्या थेट बाईचा एक वेगळाच पैलू मला या चित्रपटात रंगवण्याची संधी मिळाली असं सांगतात. आई नाही, बहीण नाही ती फक्त बाई आहे आणि बायको आहे.. हे काहीतरी वेगळंच करायला मिळालं, असं त्या सांगतात. नितीश भारद्वाज यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला तरी तनुजा यांनी त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाची पावती देऊन टाकली आहे. त्यांच्या मते चांगला दिग्दर्शक हा नेहमीच चांगला अभिनेता असावा लागतो. त्याला संकलनाचं उत्तम ज्ञान असावं लागतं, संगीताचा कान असावा लागतो. नितीश स्वत: एक चांगला अभिनेता आहे त्यामुळे त्याने फारच छान कामगिरी केली आहे. मला त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली, असे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक म्हणून एकीकडे नितीशचं कौशल्य होतं तर दुसरीकडे सचिन खेडेकरही एक उत्तम अभिनेता आहे हे त्या मान्य करतात. किंबहुना, सचिन असल्यामुळे आपल्याला इतक्या वर्षांनी एक अभिनेत्री म्हणून काम करण्याचा चांगला अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सचिन म्हणजे अप्रतिम अभिनय आहे त्याचा. तो वीस करायचा तर मी एकवीस, तो बावीस असेल तर मी तेवीस..म्हणजे तो देत होता त्यामुळे माझ्याकडून त्याच्यापेक्षा चांगलं द्यायच्या ईर्षेने काम होत होतं. इतक्या वर्षांनंतर असं कामाचं मनापासून समाधान मला अनुभवता आलं, असं त्या म्हणतात.
चित्रपटाची भाषा काय आहे, ही माझी समस्या कधीच नव्हती. कुठलीही भाषा असली तरी ती मी सहज आत्मसात करू शकते त्यामुळे भाषेपेक्षाही भूमिका काय आहे ते महत्त्वाचं होतं. म्हणून ‘पितृऋण’सारखा मराठी तित्रपट केला, असे सांगतानाच केवळ मराठीत नाही तर सध्या सगळे प्रादेशिक चित्रपट फार चांगले आणि दर्जेदार आहेत. मराठीतही इतके वैविध्यपूर्ण विषय हाताळले जात आहेत त्यामुळे मला आनंद वाटला आणि त्यामुळेच मला इतका चांगला मराठी चित्रपट करता आला, असे त्यांनी सांगितले. एक अभिनेत्री म्हणून त्यांनी काही दशकांची कारकीर्द गाजवली असली तरी आजच्या सगळ्याच अभिनेत्री खूप चांगल्या आहेत, असे मत व्यक्त करतानाच त्यांच्या कामाच्या पद्धती, चित्रपटांची निवड आणि नायिकेच्या जागेला मिळालेली दिशा यावर आपल्याला कु ठलीच टिप्पणी करायची नाही, असेही त्या स्पष्ट करतात. कधी ‘सन ऑफ सरदार’ या जावई अजय देवगणची निर्मिती असलेल्या चित्रपटातली ‘बेबे’, कधी ‘टुनपूर का सुपरहीरो’, कधी ‘पितृऋण’सारख्या निवडक चित्रपटांमधून दिसणाऱ्या तनुजा आपण अजून चित्रपट संन्यास घेतलेला नाही, हे ठासून सांगतात. कामातून पूर्णपणे विश्रांती कधी घेतात जेव्हा आपण खूप दमलेलो असतो. मला दमवून टाकेल, असं काम अद्यापपर्यंत मी केलेलं नाही, त्यामुळे अभिनयाला राम राम करण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत ‘चांगल्याच’ भूमिका मिळतील तोपर्यंत आपण कोम करत राहणार, असं त्या ज्या विश्वासाने सांगतात तो आपल्याला थक्क करून टाकतो.