रसिकांना कलेचा आस्वाद देताना प्रत्येकात लपलेल्या कलाकाराला वाव मिळावा यासाठी ठाण्यातील कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) संस्थेच्या वतीने ठाणेकरांसाठी दोन पुरस्कारप्राप्त नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ‘ओश्तोरिज’ आणि ‘पुनर्जन्म’ या दोन दर्जेदार दीर्घाकांचे विशेष खेळ २ मे रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहेत. या प्रयोगातून उभारण्यात येणारा निधी हा टॅग संस्थेच्या वतीने आयोजित विविध नाटय़ आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते त्याचप्रमाणे चित्रपट माध्यमातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कलाकारांची मोठी रेलचेल ठाण्यात असून या कलाकारांनी एकत्र येत ‘टॅग’ची स्थापना केली आहे. या माध्यमातून नवोदितांसाठी कार्यशाळा, मराठी भाषा दिनानिमित्ताने कार्यक्रम, दुर्मीळ नाटके, चित्रभाषा समजावणारा ‘चित्रगंध’ उपक्रम असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उभा राहावा, तसेच ठाणेकर नाटय़रसिकांना दर्जेदार नाटकांचा आनंद घेता यावा यासाठी दोन दीर्घाकांचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अनंत सामंत यांच्या कथेवर आधारित हृषीकेश कोळी लिखित ‘ओश्तोरिज’ आणि गिरीश दातार लिखित ‘पुनर्जन्म’ हे दीर्घाक आहेत. रवी जाधव, उदय सबनीस, विजू माने, मंगेश देसाई, गिरीश मोहिते, संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून टॅग संस्था आकारास आली आहे.