जिल्ह्य़ातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. राज्य सरकारने आदर्श गाव म्हणून गौरविलेल्या खुदावाडी येथे पाण्यासाठी जोरदार हाणामारी झाली. मंगळवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेत तीनजण गंभीर जखमी झाले. दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्याबाबत सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ उमरग्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या व तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळविणाऱ्या खुदावाडी गावालाही पाणीप्रश्नाने चांगलेच घेरले आहे. नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीनजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. खुदावाडी गावातील मंदिरासमोर पाणी भरण्याच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ सुरू झाली. बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाले. पाण्याच्या कारणावरून दोन्ही गटांनी एकमेकांचे रक्त सांडले. डोक्यात सळईने मारहाण केल्याने तिघे गंभीर जखमी झाले. महादेव खजुरे यांच्या फिर्यादीवरून भगवान सुरवसे, अशोक सुरवसे, मारुती सुरवसे व बालाजी सुरवसे यांच्यावर, तर भगवान सुरवसे यांच्या फिर्यादीवरून महादेव खजुरे, निलप्पा खजुरे, अनिल खजुरे, शिवराज खजुरे यांच्यावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मारहाणीत मारुती सुरवसे, अशोक सुरवसे व महादेव खजुरे यांचा मुलगा जखमी झाला.
उमरगा शहर व तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. अनेकांवर पाण्यामुळे गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. सामाजिक शांततेचा केव्हाही उद्रेक होऊ शकेल, अशी स्थिती आहे. याच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने उमरग्यातील बाजारपेठ बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविला. मागणीप्रमाणे टँकर मिळत नाहीत.   जनावरांना    चारा    नाही. मजुरांच्या हाताला काम नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ करण्यात आले नाही. सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे महायुतीने निवेदनात म्हटले आहे.
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर महायुतीने बंद पुकारल्यामुळे मंगळवारी बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती. सेना, भाजपा व रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रा काढली. व्यापाऱ्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. या वेळी बाबुराव शहापुरे, माधव पवार, दत्ता रोंगे, आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.