पाटोदा शहरात अनेकदा मागणी करूनही प्रभाग एकमध्ये पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात राडा केला. दुसऱ्या मजल्यावरून साहित्य फेकून दिले. तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीड जिल्ह्य़ात पाण्यासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत वेळ काढण्यात धन्यता मानत असल्याने नागरिकांचा पाण्यासाठीचा संयम सुटला. पाटोद्यात प्रभाग एकमध्ये मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. कार्यालयात कोणीच नसल्याने दुसऱ्या मजल्यावरून खुच्र्या व सामानाची तोडफोड करून फेकून दिले. कार्यालयाला कुलूप ठोकून नागरिकांचा मोर्चा थेट तहसीलवर धडकला. तहसीलदार रामलाल जाधव यांनी नागरिकांशी चर्चा करून संयम राखण्याचे आाहन केले. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये पाणी टाकले जाते. मात्र, ते कुठे गायब होते यावरून नागरिकांचा राग अनावर झाला.