सामाईक विहिरीतील पाण्याच्या कारणावरुन दोन वृद्ध भावांत झालेल्या भांडणाचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले. काल दुपारी नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात ही घटना घडली. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतीसाठी उपसा कोणी करायचा याच्या वादातून वृद्धाला त्याच्या भावाने व पुतण्यांनी उचलून विहिरीत टाकले. टंचाई परिस्थितीतून ही घटना घडल्याचे मानले जाते.
दत्तात्रेय हरिभाऊ पुंड (वय ६७) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दत्तात्रेयचा मोठा भाऊ पाराजी पुंड (वय ६८), पुतणे अशोक व विक्रम तसेच सून गयाबाई विक्रम पुंड या चौघांना अटक केली. त्यांना दि. २० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव येथे दत्तात्रेय व पाराजी या दोघांची शेती आहे. दोघांत सामायिक विहिर आहे परंतु त्यावर दोन स्वतंत्र वीज पंप आहेत. दत्तात्रेयची वीज मोटर ५ अश्वशक्तीची तर पाराजीची ३ अश्वशक्तीची आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. काल दुपारी दत्तात्रेयने आधी मोटर सुरु केली, त्याला पाराजीने हरकत घेतली. दोघांत वाद झाले, त्याचे पर्यवसान भांडण व मारामारीत झाले. पाराजीची दोन मुले व सुनही आले. या सर्वानी मिळून दत्तात्रेयला उचलून विहिरीत टाकले. विहिरीत आपटल्याने व कमरे इतक्या पाण्यात बुडाल्याने दत्तात्रेयचा मृत्यू झाला. दत्तात्रेयची पत्नी सिंधू (वय ६२) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.