महापालिकेला आली उशिराने जाग
अवघ्या दीड महिन्यांवर दहावीची परीक्षा येऊन ठेपलेली असतानाच उशिरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नपत्रिका संच देण्याचा निर्णय घेतला असून त्या संबंधी प्रस्तावही तयार केला आहे. त्यासाठी दोन लाख दहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने उद्या, शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आणला आहे.
ठाणे महापालिकेच्या दहा मराठी तसेच तीन उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळा असून त्यामध्ये दहावीचे एक हजार चार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनीत प्रकाशनाचे २१ अपेक्षित प्रश्नपत्रिका संच खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यासाठी वितरकाने दहा टक्के सवलत दिल्याने दोन लाख दहा हजार २३३ रुपये खर्च अपेक्षित असून माध्यमिक शिक्षण विभागाकडे शैक्षणिक शिबिरे या लेखाशीर्षांअंतर्गत पाच लाखांची तरतूद आहे. त्यातून या प्रश्नसंच खरेदी करण्यात यावेत, असे महापालिका प्रशासनाने प्रस्तावामध्ये सुचविले आहे.  महापालिका शाळेत मराठी माध्यमात दहावीचे सुमारे ८५२ विद्यार्थी असून त्यांना मराठी-कुमारभारती, इंग्रजी (एलएल), इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, बीजगणित, भूमिती, असे प्रश्नपत्रिका संच देण्यात येणार आहेत. त्यासाठी एक लाख ७३ हजार २९७ रुपये खर्च येणार आहे. तसेच उर्दू माध्यमामध्ये दहावीचे १५२ विद्यार्थी असून त्यांना उर्दू-कुमारभारती, इंग्रजी (एलएल), मराठी आंतरभारती (संयुक्त), हिंदी लोकभारती (संयुक्त), इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, बीजगणित, भूमिती असे प्रश्नपत्रिका संच देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३६ हजार ९३६ रुपये खर्च येणार आहे. येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार असून तत्पूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच सोडविण्याचा सराव करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला आहे. परीक्षेच्या दोन ते तीन महिने आधी महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच दिले असते तर त्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करता येऊ शकला असता. मात्र, जेमतेम दीड महिन्यांवर दहावीची परीक्षा येऊन ठेपलेली असताना महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्यांना कितपत उपयोगी ठरतील, याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.