उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागताच शहरातील विविध भागात शीतपेय आणि पाणी पुरीच्या गाडय़ा दिसू लागल्या आहेत. लिंबू पाणी, निरा, ताक, ऊसाचा रस, नारळ पाणी आणि ऑरेंज, काला खट्टा, गुलाब अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सरबताची विक्री या गाडय़ांवरून होत आहे. यासोबतच आबालवृद्ध पाणी पुरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. मात्र, या विक्रेत्यांकडे असलेले पाणी शुद्ध आहे की नाही?, ते पाणी कुठून आणतात? यांची महापालिकेडून कुठलीच चौकशी किंवा कारवाई केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे.
उन्हाची दाहकता शमवण्याची या सरबतांमध्ये ताकद असली तरी या सरबतांसाठी वापरलेले पाणी किती शुद्ध हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सामान्य लोकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरच्या या गाडय़ावरचे सरबत पिणे किंवा पाणी पुरीच्या गाडीवरील मडक्यातील आंबट-गोड पाणी पिणे आरोग्यास योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
असे असले तरी रणरणत्या उन्हाने त्रस्त झालेली जनता याकडे दुर्लक्ष करीत या सरबताचे अनेक प्याले रिचवताना दिसतात.
शहरातील विविध भागात आज एक हजारांवर सरबत आणि पाणी पुरी विक्रेते दिसून येतात. विशेषत: रहदारीच्या ठिकाणी किंवा शाळा महाविद्यालयाच्या बाहेर हमखास उभे असतात. सरबतामध्ये वेगवेगळे फ्लेवर वापरून सरबताची पाच ते पंधरा रुपये ग्लासप्रमाणे विक्री करीत असतात. सरबताचा आस्वाद घेताना त्यात वापरण्याच आलेले फ्लेवर कोणत्या कंपनीचे किंवा दर्जाचे आहे याचा विचार सामान्य माणूस करीत नाही. शिवाय पाणी पुरीमध्ये वापरण्यात येणारे पाणी हे ठेलेवाले आणतात कुठून याची विचारपूस आपण कधी करीत नाही. शहर आणि ग्रामीण भागात सरबत आणि पाणी पुरी विक्रेत्यांची दीड ते दोन हजारांच्यावर संख्या असते. विशेषत: छोटय़ा छोटय़ा गावातील बसस्टँडवर तर सरबताच्या, उसाच्या रसाचे आणि पाणी पुरीचे ठेले हमखास दिसून येतात. बाहेरगावी जाणारे प्रवाशांना अनेकदा बसस्थानकावर पाणी मिळत नाही नसल्यामुळे अशा ठेल्यांचा ते आसरा घेत असतात.
अनेक दुकानांमध्ये पाण्याच्या पाऊचची विक्री केली जाते. मात्र, हे पाऊच किती दिवसांपूर्वीचे आहे याचा विचार करीत नाही. अनेकदा सरबताच्या ठेल्यावरील किंवा पाणीपुरी विक्रेत्याकडील पाणी हे चांगले नसल्यामुळे काही जागृत नागरिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी करीत असतात. मात्र, त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येते त्यामुळे पाणीपुरी किंवा सरबत विक्रेते आज शिरजोर झाले आहेत.
शंकरनगर, बजाजनगर, फुटाळा तलाव, प्रतापनगर चौक, नंदनवन, सक्करदरा, गोकुळपेठ, लॉ कॉलेज चौक, धरमपेठ त्रिकोणी मैदान, गांधीसागर, सक्करदरा तलाव या शिवाय शहरातील तलाव आणि उद्यानाच्या आसपास दिसून येतात. याची महापालिकेकडे कुठेही नोंद नसल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील काही सरबत आणि पाणी विक्रेत्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, महापालिकेकडे आमची नोंद नाही. सरबतासाठी पाणी कुठून आणता असे विचारले असता तुमको क्या करना है, बिसलरीके पाणीसे सरबत तयार किया जाता है’ असे उत्तर देऊन ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात. शहरातील अनेक सरबत आणि पाणी पुरी विक्रेत्यांनी आमची कुठेही नोंद नसल्याचे सांगितले. कोणी महापालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी आमच्याकडे आला नसल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.
ही सर्व विक्रेते उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश या राज्यांतील असून शहरात मिळेल त्या ठिकाणी हातगाडी उभी करून व्यवसाय करीत असतात.

तक्रार आल्यास कारवाई..
या संदर्भात महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. अशोक उरकुडे यांनी सांगितले, शहरातील विविध भागात पाणी पुरी आणि सरबत विक्रेते असून त्यांच्या संदर्भातील तक्रारी आल्यास त्यांच्याकडील पाण्याचे नमुने आम्ही घेत असतो. शहरातील पाणी पुरी आणि सरबत विक्रेत्यांची नोंद महापालिकेत त्या त्या विभागाच्या झोनल अधिकाऱ्याकडे असावी, अशी शक्यता आहे. यांची नोंदणी ठेवण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची नाही. शहरातील पाणी पुरी आणि सरबत विक्रेत्यांना परवाने देऊन त्यांच्या नोंेदी ठेवणे आवश्यक आहे. हे विक्रेत शहरातील एका भागात राहत नाही तर वेगवेगळ्या भागात फिरत असतात त्यामुळे कारवाई करायची असेल तर ते नियोजित जागेवर दिसून येत नाहीत. पाणी पुरी किंवा सरबत विक्रेत्यांकडे नागरिकांना दूषित पाणी आढळल्यास त्यांनी संबंधित झोनच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली तर कारवाई करण्यात येईल, असेही उरकुडे यांनी सांगितले.