रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सध्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचा धुमधडाका उडवून देण्यात आलेला असताना या सप्ताहामुळे खरोखर रस्ता व वाहतूक सुरक्षेविषयी कितपत जागृती होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सप्ताहानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांवर पैसा खर्च करण्यापेक्षा तो खर्च रस्त्यांची दुरूस्ती, वाहतूक पोलिसांसाटी मार्गदर्शन वर्ग आदी कामांसाठी केल्यास अधिक उपयुक्त होऊ शकेल, असे मत जिल्हा प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. केवळ एका सप्ताहापुरती रस्ता सुरक्षाविषयक जागृती करून कोणताही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने रस्ता सुरक्षा सप्ताहात नेमके कोणते आणि किती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी केली आहे. राज्यात अनेक शहरी आणि ग्रामीण भागातील  रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पडलेले खड्डे, नियमांचे पालन न करता करण्यात आलेले गतिरोधक हे पोलीस आणि प्रादेशिक परिवहनच्या सौजन्याने निर्माण झाल्यामुळेच अपघातांना तेही कारणीभूत ठरले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची ने-आण केल्यास, मद्यपान करून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणे, असे प्रकार सर्रासपणे दिसून येतात. परंतु कारवाई किती जणांविरूध्द याबद्दल साशंकता आहे. वाहनांचे दिशादर्शक दिवे, ब्रेक कार्यरत आहेत किंवा नाही याची प्रादेशिक परिवहन आणि पोलीस यांच्या वतीने सातत्याने तपासणी होणे आवश्यक आहे. नियम बाजूला सारून वाहनांवर आकर्षक पध्दतीने भाऊ, दादा, नाना अशा विविध नावांचा आभास होईल असे नंबर लिहिणे, हे प्रकारही कायम घडत आहेत. परंतु त्याकडे दिसत असूनही दिसत नसल्यासारखे केले जात आहे.
इतर राज्यातील पर्यटक किंवा मालवाहतूकदार जेव्हा नाशिक जिल्ह्यात येतात तेव्हा त्यांना प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांकडून येणारा कटू अनुभव सर्वाना माहीत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असतानाही त्यांना सौजन्य आणि नम्रतेची वागणूक दिली जात नाही. याशिवाय शहर आणि ग्रामीण भागात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून दिल्यास आणि त्याचे प्रशिक्षण त्यांना दिल्यास बेशिस्त वाहतूक आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. परिवहन महामंडळाच्या अनेक गाडय़ांची कालमर्यादा संपल्याने त्यांचे नादुरूस्ती होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात तर बसच्या तांत्रिक दोषांमुळे प्रवाशांना मनस्ताप करण्याची वेळ अनेकवेळा आली आहे. त्यामुळे प्रवासी आणि कामगार हे वैतागून अन्य खासगी वाहनांचा आश्रय घेत असल्याचे दिसून येते. नाशिकरोड रेल्वे स्थानकात सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत आठ ते १० रेल्वे गाडय़ा ये-जा करत असतात. रेल्वे स्थानकात प्रवासी उतरल्यानंतर त्यांना नाशिक शहराकडे येण्यासाठी बसेस कधीही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. संबंधित स्थानक प्रमुखांकडूनही याबाबतीत प्रवाशांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही.
शहरात बसमध्ये जागा असतानाही अनेक चालक थांब्यांवर बस थांबवित नाहीत. नाशिक शहरातील ५० टक्के भाग अजूनही शहर बस वाहतुकीपासून वंचित आहे. या सर्व समस्यांचा निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे.