नाशिक र्मचट्स बहुराज्यीय बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर सुरू झालेले पैसे काढण्याचे सत्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अधिकच वाढले. पैसे काढणाऱ्यांची सर्व शाखांमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे बँकेला पोलीस बंदोबस्त व खासगी सुरक्षारक्षक तैनात करावे लागले. प्रशासकांनी या दिवशी काही शाखांमध्ये भेटी देऊन ग्राहकांना बँकेची आर्थिक स्थिती मजबुत असून कोणीही पैसे काढून आपले नुकसान करू नये असे आवाहन केले. रिझव्र्ह बँकेने नामकोवर कोणतेही आर्थिक र्निबध लादलेले नाहीत. प्रशासकीय सुधारणांसाठी ही कारवाई झाली असल्याने अफवांवर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन बँकेने केले आहे.
सुमारे पावणे दोन लाखहून अधिक सभासद असणाऱ्या येथील नाशिक र्मचट्स बहुराज्यीय सहकारी बँकेवर रिझव्र्ह बँकेने सोमवारी प्रशासक नियुक्त केला आणि बँकेशी संबंधित प्रत्येक घटकात अस्वस्थतेचे वातावरण पसरले. व्यवस्थापकीय प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी ही कारवाई झाल्याचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी सांगितले असले तरी यापूर्वीचे इतर बँकांचे अनुभव चांगले नसल्याने त्याचा धसका सर्वानी घेतल्याचे पहावयास मिळाले. सोमवारी दुपारपासून बँकेच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदार व ठेवीदारांची गर्दी झाली होती. मंगळवारी तर बँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शेकडो खातेदार व ठेवीदार शाखांबाहेर जमा झाले. या गर्दीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल याची जाणीव असल्याने बँकेने पोलीस यंत्रणेला पत्र देऊन आवश्यकता भासेल तिथे पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. त्यानुसार अनेक शाखांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात झाला. प्रत्येकाला पैसे काढावयाचे असल्याने जादा कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर शिंदे यांनी सांगितले. नामकोच्या बहुतांश शाखांमध्ये दुसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती होती. शाखांबाहेर रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सिडकोतील राजरत्ननगर भागात नागरिकांचा कमालीचा गोंधळ सुरू असल्याने कर्मचारी कामकाज सुरू करण्यास तयार नव्हते. काही ठिकाणी गर्दीमुळे ग्राहकांना रांगेत प्रवेश दिला गेला. शहरातील प्रत्येक शाखेत कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती असल्याने प्रशासक भोरिया यांनी काही शाखांत स्वत: भेट दिली. खातेदार व ठेवीदारांना त्यांनी समाजाविण्याचा प्रयत्न केला. नामकोची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन त्यांनी केले. ठेवीदारांनी आपल्या ठेवी विहित मुदतीआधी खंडित केल्यास नुकसान होवू शकते. त्यामुळे नागरिकांनी मुदतपूर्वी ठेवी काढून आपले नुकसान करू नये असे आवाहन केल्याचे भोरिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  दरम्यान, नाशिक शहरात यापूर्वी काही पतसंस्था व बँकांचा वाईट अनुभव असल्याने ग्राहक कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
..पण ग्राहकांमध्ये संभ्रम
प्रतिनिधी, नाशिक
नाशिक र्मचट्स सहकारी बँकेचे संचालक मंडळ तडकाफडकी बरखास्त करताना रिझव्र्ह बँकेने कोणतेही आर्थिक र्निबध लादले नसले तरी बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी सभासद, खातेदार आणि ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बँकेवर विश्वास असला तरी एकंदर स्थिती लक्षात घेऊन पैसे काढून घेतले जात असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. कोणी आपल्या आयुष्यभराची पुंजी खात्यात ठेवलेली तर
कोणी मामला पैशांचा असल्याचे सांगून पैसे काढण्यासाठी आले. काही खातेदार व सभासदांनी  रिझव्र्ह बँकेच्या कार्यपध्दतीविषयी तक्रार केली. आर्थिक स्थिती चांगली असताना या कारवाईमुळे बँकेच्या नावलौकीकावर प्रश्नचिन्ह लागल्याचे म्हटले आहे. पैसे काढण्यासाठी जमलेले खातेदार व ठेवीदारांच्या या काही प्रतिनिधीक प्रतिक्रिया..

जीव टांगणीला
बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. खातेदारांनी घाबरायचे कारण नाही असा फलक बँकेच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. मग पैसे काढण्यासाठी गर्दी कशाला? सध्या बँकेत ६० हजार रुपयांची ठेव आहे. या शिवाय खात्यावर काही रक्कम आहे. घाबरायचे नाही मान्य, पण सगळेच पैसे काढायला लागले तर बँकेकडे पैसे तरी कसे राहतील. त्यापेक्षा जेवढे मिळतील तेवढे पैसे घ्यायचे ठरवले आहे. रिझव्र्ह बँकेच्या कृतीमुळे सर्वसामान्यांनाचा जीव नाहक टांगणीला लागला आहे.          – लक्ष्मीकांत कांची
मामला पैशाचा आहे.
काल मित्राने फोन करून सांगितले की बँकेवर प्रशासक नेमला. त्या एकाच बातमीने रात्रीपासुन झोपलो नाही. या बँकेत १५ वर्षांपासून खाते आहे. मुलीच्या लग्नासाठी, घरासाठी काहीही असले की कर्जाच्या माध्यमातून या गरजा पुर्ण झाल्या आहेत. बँकेने कधी कुठे अडवणूक केली नाही. बँकेत १० लाखाची ठेव आहे. काही दागिने लॉकर्समध्ये आहे. पण या एका बातमीने द्विधा मनस्थिती झाली आहे. कारण मामला आपल्या कष्टाच्या
 पैशाचा आहे.                 
किशोर चोपडे

‘आरबीआय’ने कारवाईआधी विचार करणे गरजेचे होते
बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे याबद्दल विश्वास आहे. मात्र सध्या सगळे ठेवीदार, खातेदार पैसे काढत आहे. अशा परिस्थितीत बँकेवर विश्वास कसा राहील? वास्तविक संचालक आणि बँकेतील कर्मचारी संघटनेचा आपआपसातील हा वाद होता. रिझव्र्ह बँकेने त्याची दखल घेऊन प्रशासकाची नियुक्ती केली. पण बँकेवर कुठल्याही प्रकारचे आर्थिक बंधन लादले नाहीत. याचा अर्थ बँकेची आर्थिक परिस्थिती मजबुत आहे. पण प्रशासक नियुक्ती मुळे बँकेच्या एकुणच कामकाजाबद्दल, तिच्या नावलौकीकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर.बी.आयच्या कारवाईमुळे सामान्य ठेवीदार मात्र हवालदिल झाला आहे.                          
नीलेश महाजन

बँकेवर विश्वास पण..
बँकेचा आजवरचा आर्थिक व्यवहार सुरळीत आहे. त्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. मात्र काल एक लघूसंदेश आला आणि सगळे चित्र पालटून गेले. आजही बँकेच्या एकंदरीत व्यवहारावर आमचा विश्वास असला तरी पैशांच्या बाबतीत धोका पत्करायला मन
तयार नाही.          – सुरेंद्र कांतीलाल बाफणा

आपली सर्व पुंजी बँकेत आहे
काही पोरं आली आणि म्हणाली, बाई तुमची बँक बुडाली. धुणी-भांडी करून आत्तापर्यंत तीस हजार रुपये जमविली आहेत. ही सगळी पुंजी मी बँकेत ठेवली. पण आता सगळे म्हणता बँक बुडाली. मी कुणाकडे पैसे मागु? सकाळपासून पैसे घ्यायला लाईनीत उभी आहे. बघु काय होतं ते?      – सुंदराबाई सुपे