डोंबिवली पूर्व भागातील केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर वाहतूक विभागाने रिक्षांच्या रांगा लावण्याची पद्धत अखेर सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही पद्धत यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व रिक्षा वाहनतळांवर या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे कल्याण वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सयाजी डुबल यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून नोकरदार वर्ग कामावरून परतला की केळकर रस्ता, इंदिरा चौकातील रिक्षा पकडण्यासाठी त्यांचे हाल होतात. डोंबिवलीत कोणत्याही रिक्षाथांब्यावर रांगेने रिक्षा पकडण्याची सोय नाही. त्यामुळे जो आधी पोहोचेल त्याला रिक्षा मिळेल, असे प्रकार येथे सुरू असतात. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. या विषयावर सर्वसमावेशक उपाय सुचवण्यासाठी सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन, वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, साहाय्यक पोलीस आयुक्त सयाजी डुबल यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत शहरातील दक्ष नागरिक संघाचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर तसेच खासगी संघटना, रिक्षाचालक, संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा करण्यात आली. या बैठकीत रिक्षा वाहनतळावर होणाऱ्या अनागोंदी परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर रांगा लावून सेवा पुरविण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ रहिवासी तसेच गर्भवती महिलांना रांगेत प्रथम प्राधान्य असेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीचे काही दिवस वाहतूक पोलीस, दक्ष नागरिक संघ, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी ही ‘क्यू’ पद्धत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर शहरातील अन्य वाहनतळांवर रांगा सुरू केल्या जातील, असे सयाजी डुबल यांनी सांगितले.

टाटा लाइनखाली कारवाई
गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली पूर्व भागातील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील टाटा लाइनखाली अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येत आहेत. फुकट वाहनतळ उपलब्ध झाल्याने दुचाकी ते चारचाकी अशी सुमारे २५० ते ३०० वाहने दररोज या भागात नागरिकांकडून उभी करण्यात येतात. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी या अनधिकृत वाहनतळाविषयी तक्रारी नोंदविल्या होत्या. पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांना या तक्रारी प्राप्त होताच त्यांनी स्थानिक वाहतूक शाखेला टाटा लाइनखालील वाहने उचलण्याचे आदेश दिले आहेत.