नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पहिल्याच सभेत आज उर्दूतून विषयपत्रिका देण्यावरून रणकंदन झाले. शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने ही सभा चांगलीच गाजली. शेवटी महापौरांनी उर्दूतून विषयपत्रिका देण्यात येईल, असे जाहीर केले.
नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडल्यानंतर सोमवारी पहिलीच सर्वसाधारण सभा महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला स्थायी समिती तसेच महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर विषयपत्रिकेचे वाचन सुरू झाले. शहरातल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करताना योग्य ती कारवाई व्हावी, असे माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी सांगितले. शहरातल्या स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी आयुक्तांना फैलावर घेतले. एकाही आरोपाचा खुलासा त्यांना करता आला नाही. सभेच्या शेवटी एमआयएमच्या शफी कुरेशी यांनी सच्चर कमिटीच्या आयोगाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी महापालिकेची विषयपत्रिका उर्दूतून देण्याचे सुचविले. त्याला शिवसेनेच्या दीपकसिंह रावत यांनी तीव्र विरोध केला.
उर्दूत विषयपत्रिका दिली तर उद्या तेलगू, तामिळ, गुजराती, पंजाबी या भाषेतही विषयपत्रिका द्यावी लागेल. महापालिकेच्या सभागृहाला जातीय स्वरुप देऊ नका, असे आवाहन केले. पण बहुमताच्या जोरावर महापौर अब्दुल सत्तार यांनी उर्दूतून विषयपत्रिका देण्याची मागणी मान्य केली. पूर्वी अशा प्रकारची विषयपत्रिका दिली जात असे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच मुद्दय़ावरून शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले.