मेळावा नियोजनात वादाची फोडणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत वादाची फोडणी जोरदारपणे तडतडली, त्याचा ठसका अनेकांना लागला. शाब्दिक चकमक, आरोप, खुलासे, अप्रत्यक्ष ठपके, हरकती, टोमणे, खंत असे अनेक तडके या फोडणीत तडतडले. यात पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार दादा कळमकर व भानुदास मुरकुटे, तालुकाध्यक्ष भिमराव फुंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे असे अनेकजण सहभागी झाले.
दि. १५ रोजी राष्ट्रवादीने नगरमध्ये पक्षाचा महिला मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे, त्याच्या नियोजनासाठी व जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी दुपारी राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. महिला प्रदेशाध्यक्ष आ. विद्या चव्हाणही यावेळी उपस्थित
होत्या.
दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांसाठी सरकार मदत देण्यास तयार आहे, मात्र प्रशासन कमी पडते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अन्यथा लोकांची पक्षाबद्दल नाराजी वाढेल व आपल्याला अडचणीही निर्माण होतील, असे सांगत सुरुवातीलाच शेलार यांनी पालकमंत्र्यांवर तोफ डागली. त्याचवेळी व्यासपीठावरुन माजी आमदार मुरकुटे यांनी पाथर्डीचे तालुकाध्यक्ष फुंदे यांना उद्देशून ‘मुंबईत राहता आणि येथे राजकारण करता’ अशी शेरेबाजी केली. ताडकन उठत फुंदे यांनी माईक ताब्यात घेतला आणि मुरकुटे यांना प्रत्युत्तर देताना ‘आमचे नेते गोपीनाथ मुंडे भक्कम नेते आहेत’ असाही संदर्भ दिला. या वादात वडिलांच्या मदतीला युवा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ यांनीही उडी घेतली व फुंदे यांना नीट बोला अशी समज दिली, त्यातून आवाज चढले गेले व वाद रंगला. अखेर आ. घुले, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संदिप वर्पे यांनी मध्यस्थी केली व फुंदे खाली बसले.
आ. घुले यांनीही बोलताना जिल्ह्य़ात आम्ही संस्थापक आहोत, याची जाणीव करुन दिली. पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना दुसऱ्याच्या हाती कोलीत दिले जाणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. माजी जिल्हाध्यक्ष कळमकर यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष शेलार यांना धारेवर धरले. जिल्हाध्यक्ष विरोधी पक्षांच्या मोर्चात जातात हे बरोबर नाही, त्यांनी हे थांबवावे, खेडय़ापाडय़ात जाऊन आम्ही पक्ष बांधला तो परत लाईनीवर आणण्यासाठी सर्वाना संघटीत करावा लागेल, आपली विश्वासार्हता जपली पाहिजे, तुमचे पालकमंत्र्यांशी असलेले राग लोभ विसरावे लागतील, त्याशिवाय सन २०१४ च्या निवडणुका जिंकता येणार नाहीत, दुष्काळातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनीच अधिकाऱ्यांच्या मागे रेटा लावला पाहिजे, नाहीतर रस्त्यावर उतरले पाहिजे, असे कळमकर म्हणाले. शेलार यांनी लगेचच कळमकर यांच्या आक्षेपास प्रत्युत्तर दिले. दशक्रिया विधीसाठी श्रीगोंद्यात जात असताना आपली गाडी कुकडीच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय रस्ता रोको करणाऱ्यांनी अडवली, पक्षहितासाठीच आपण सहभागी झालो, त्याची पूर्वसूचना पालकमंत्र्यांना दिली होती, आपण आंदोलनात सहभागी झाल्याने पालकमंत्र्यांवर टिका, आरोप झाले तरी पक्ष व उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर रोख गेला नाही, आपणही
प्रशासनाचे नियोजन चुकले असेच सांगितले, कळमकर यांनी
गैरसमज करुन घेऊ नये असे स्पष्ट केले.
आपण कोणताही खुलासा करणार नाही, असे वारंवार स्पष्ट करणाऱ्या पाचपुते यांनी त्यांच्यावरील आक्षेपांचे खुलासे करत प्रत्युत्तर दिले. त्यांनी अप्रत्यक्षपणे शेलार व इतरांवर ठपके ठेवले. ते म्हणाले, एवढे मोठे राष्ट्रवादी भवन उभारले, येथे विविध उपक्रम सुरु करायचे होते, परंतु कोणीही काहीही केले नाही, त्यामुळे आता मीच पुढाकार घेतो.
पक्षामुळे मी पालकमंत्री आहे, परंतु मी केलेल्या कामाचा पक्षाला फायदाच होणार आहे, त्या कामाची जाहिरात मीच करणे बरोबर नाही, संघटनेने, कार्यकर्त्यांनी केली पाहिजे, जे काम करतो ते पक्षासाठीच करतो, कोणी आले नाही तरी कार्यक्रम होणारच, केलेल्या कामाचे क्रेडिट पक्ष घेणार की नाही? पक्षाच्या कार्यक्रमांना पाहिजे ती, कोणतेही कारण न सांगता
मी मदत करतो, पार्टी म्हणजे काही वाऱ्यावरची वरात नाही,
एकटय़ाने पक्षाचे काम वाढणार नाही, सामूहिक व एकत्र काम केले
पाहिजे. एवढे तरी मला बोलले
पाहिजे.

नरेगाचा फायदा पक्षालाच होणार!
ल्ल  नरेगाचे सर्वात अधिक काम जिल्ह्य़ात झाले, परंतु माझी टिंगलटवाळी चालवली आहे, मी आलो की ‘आला नरेगा’ असा उल्लेख केला जातो, परंतु या कामाचा फायदा पक्षालाच होणार आहे, ‘नरेगा जो करेगा वो तरेगा, नही करेगा वो मरेगा’, दुष्काळात नरेगामुळेच कामे मिळणार आहेत, एकतरी कार्यकर्ता माझ्या बाजूने बोलला का? असेही पाचपुते म्हणाले.
ल्ल चारा डेपोचे चौकशीचे अहवाल अडचणीचे होते म्हणून छावण्यांचा निर्णय घेतला. जेथे कारखान्यांना ऊस जातो तेथेही छावण्यांची मागणी केल्यावर अधिकारी कसे ऐकतील? परंतु छावण्यांमुळे मला कॅबिनेटमध्ये ऐकून घेण्याची वेळ आली. चौकशी लागली, कोणी जनावरे विकत आणून छावण्यात ठेवली, कोणी पाहुण्यांची आणली, दुष्काळाच्या नावाखाली धंदा करुन लुटायला निघाले होते, याकडे पाचपुते यांनी लक्ष वेधले.