राष्ट्रवादी, मनसेला नाहिदाबानो यांचा टोला

जिल्हय़ाच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे पदाधिकारीच अडथळा आणत असल्याचा आरोप बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांनी केला. समस्या सोडविण्याऐवजी बैठकांमधून उठून जाणे, कामे होत नसल्याची नाहकच ओरड सत्ताधारी आघाडीतील पदाधिकाऱ्यांतून होत असल्याचा आरोप करण्यात आला. उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील कामे टाळली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जलसंधारणाच्या चार प्रस्तावांवरून हा वाद चिघळल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच अपक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या २ समर्थकांच्या समर्थनामुळे काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली. आता मतदारसंघात निधी ओढण्याच्या अनुषंगाने वाद चिघळले आहेत. जलसंधारणाच्या बैठकीत कामे होत नसल्याची तक्रार उपाध्यक्ष विजयाताई चिकटगावकर यांनी केली होती. ऐनवेळी इतिवृत्तान्त दिले जातात. त्यामुळे विकासकामांविषयी भूमिका ठरविताना अडचण येत असल्याची तक्रार करण्यात आली. बठकीतून विजयाताई उठून गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारीही चिडले.
आता हे वाद पक्षीय पातळीवर सोडवायचे का, असा सवाल अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांनी केला. या अनुषंगाने नेत्यांसह बैठक घेतली जाणार आहे. पण गेल्या आठ महिन्यांपासून सत्तेची फळे चाखणाऱ्या पदाधिकाऱ्यांतील वाद चव्हाटय़ावर आले आहेत.