दसऱ्यानिमित्त शहरात कस्तुरंचद पार्क, चिटणीस पार्क, मेडिकल चौक, समर्थ नगरसह विदर्भातील विविध भागात उद्या रावण दहनाच्या कार्यक्रमासोबत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रामलीला आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे.  
सनातन धर्म सभा या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कस्तुरचंद पार्क मैदानावर दसरा महोत्सव व रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात विविध रामकथावर आधारित नृत्यनाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम व फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून रामायणातील ‘अग्निपरीक्षा’ या विषयावर नाटिका सादर करण्यात येणार आहे.  
गेल्या ६३ वषार्ंपासून सनातन धर्म सभा संस्थेतर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याला नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. यावर्षी लाईट आणि साऊंडच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंग सादर करणार असून त्यासाठी मुंबईच्या कलावंतांना आमंत्रित करण्यात आले.
कार्यक्रमाला विभागीय आयुक्त अनुपकुमार, महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांच्यसहीत विजय खेर आणि संस्थेचेपदाधिकारी उपस्थित राहणार आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात विशेष आमंत्रित, आजीवन सदस्य व देणगीदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना येण्यासाठी चार प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. प्रवेशपास धारकांना आत प्रवेश राहणार असून ज्या नागरिकांजवळ प्रवेशपत्र नाही अशा लोकांसाठी परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सनातन धर्म संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार असल्याचे खेर यांनी सांगितले. पार्किंगची व्यवस्था फुटबॉल मैदानावर करण्यात आली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे चिटणीस पार्कमध्ये रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावर्षी आगळ्या वेगळ्या फटाका शोचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच वषार्ंपासून चिटणीस पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जात असून परिसरातील नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. रावणाची ५६ फूट उंच प्रतिमा तयार करण्यात आली असून त्याचे दहन करण्यात येणार आहे. यावेळी शस्त्रपूजन आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रावण दहन होईल. यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग ५६ तर्फे पूर्व समर्थनगरातील महापालिकेच्या मैदानात रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.