‘ससा तो कसा की कापूस जसा..’ या गाण्याची लोकप्रियता आजही तिन्ही पिढय़ात कायम आहे. या गाण्याबरोबरच ससा व कासवाच्या शर्यतीची गोष्ट आजही घराघरात सांगितली जाते. पुराणकथांमधील सशाचे स्थान आजच्या पिढीनेही जपले आहे. स्वामीनिष्ठा शिकावी ती पाळीव प्राण्यांकडूनच. अशाच एका सशाने आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वामीनिष्ठेचा मानवाला धडा घालून दिला.
    अयोध्यानगरातील श्रीरामवाडीत राहणारे विजय चरपे यांच्या घराला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागून त्यात सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत त्यांच्या घरातील कपडे, गाद्या व कागदपत्रे जळून खाक झाली. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजेरेटर, पंख्याचे पत्रे, भांडी, तसेच खुच्यार्ंचे लोखंड आगीच्या उष्णतेमुळे वाकून काळे ठिक्कर पडले. आगीत या कुटुंबाचे सर्वस्वच नष्ट झाल्याने हे कुटुंब उघडय़ावर आले. शेजाऱ्यांनी त्यांना आसरा दिला. मुलींची शालेय पुस्तके, वह्य़ांसह सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले. घाट रोडवरील एका खाजगी कंपनीत रखवालदार असलेल्या विजय चरपे व त्यांच्या कुटुंबाला पुन्हा शून्यातून संसार उभा करावा लागणार आहे.
    ही घटना घडली तेव्हा विजय चरपे घरी नव्हते. ते कामावर गेले होते. त्यांची पत्नी नंदा व दोन मुली घरीच होत्या. या भीषण आगीत घरातील सर्व सामान बेचिराख झाले असले तरी विजय चरपे यांच्या पत्नी व दोन मुलींचा जीव वाचला. या तिघींचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी घरात पाळलेल्या सशाने मात्र त्याच्या प्राणाचे बलिदान दिले. रात्री घराला आग लागली तेव्हा विजय चरपे यांची पत्नी नंदा व दोन मुली घरी झोपल्या होत्या. रात्री आग लागली तेव्हा त्या गाढ झोपेत होत्या. त्यांनी घरी पाळलेला ससा मात्र झोपलेला नव्हता. रात्री आग लागल्याचे सर्वप्रथम त्याच्या निदर्शनास आले. त्याने आवाज करून या तिघींना उठवायचा प्रयत्न केला. गाढ झोपेत असल्याने त्यांना जाग येत नव्हती. अखेर या सशाने त्यांना धक्के मारून जागे केले.
    सशाच्या धक्क्याने नंदा उठून बसल्या. त्यांना घरातील आजूबाजूला सर्व सामान पेटलेले दिसले. नंदाने लगेचच दोन्ही मुलींना जागे केले आणि त्या लगेचच घराबाहेर पडल्या. त्या बाहेर पडल्या असतानाच घरातील गॅसच्या सिलिंडरमध्ये स्फोट झाला. सिलिंडरमधील गॅसमुळे आग अधिकच भडकली. या घटनेमुळे त्यांना धक्काच बसला. काही वेळाने त्या सावरल्या. मात्र,
    घरात असलेल्या सशाचा आगीत होरपळून जीव गेलेला होता. कुत्रा हा सर्वाधिक स्वामीनिष्ठ प्राणी आहे, हे खरे असले तरी कुठलाही पाळीव प्राणी हा स्वामीनिष्ठ असतो, हे या सशाने दाखवून दिले. ससा किंवा मानव हे दोघे वैज्ञानिकदृष्टय़ा सस्तन प्राणीच म्हणून ओळखले जातात. विशेषत: एकमेकांचे पाय ओढण्याचा मानवी गुण सर्वश्रुतच
    आहे. सशाने मात्र स्वामीनिष्ठेचा परिचय दिला. कालच्या आगीच्या घटनेनंतर विजय चरपे यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे सर्वानाच दु:ख झाले. मात्र, सशाच्या बलिदानामुळे सर्वाचीच हृदये हेलावून गेली.