अतिवृष्टीचा तडाखा खाल्ल्यानंतर दिवाळी आटोपताच शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागला असून विदर्भात रब्बी पेरणीला प्रारंभ झाला आहे. यावर्षी पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही शेतक ऱ्यांचा कल हरभरा पिकाकडेच अधिक आहे. राज्याच्या इतर भागातील तुलनेत विदर्भ रब्बीच्या पेरणीतही  बराच मागे म्हणजे शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भात जेमतेम आतापर्यंत ५ टक्के पेरणी आटोपली आहे. यात अमरावती विभागात ७ टक्के तर नागपूर विभागात ४ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत विदर्भात १० टक्के पेरणी आटोपली होती. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतक ऱ्यांमध्ये नैराश्य आहे. अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही मदत न मिळाल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी जमीन तयार करणे, बियाणे व खतांची व्यवस्था करणे यामध्येही अनेक शेतक ऱ्यांना अडचणी आहेत.
विदर्भात रब्बी पिकांचे क्षेत्र ११ लाख, २९ हजार हेक्टर आहे. यामध्ये अमरावती विभागातील ६ लाख, ६७ हजार हेक्टर आणि नागपूर विभागाील ४ लाख, ६१ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अमरावती विभागात आतापर्यंत ५० हजार हेक्टर क्षेत्रात तर नागपूर विभागात २५ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यावर्षी पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांचा हरभरा पिकाच्या पेरणीकडे कल आहे. विदर्भात हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र जवळपास ५ लाख हेक्टर असून आतरपत २५ हजार हेक्टर क्षेत्रात तर गव्हाची २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे तेच शेतकरी गहू पिकाची पेरणी करीत आहेत. यासोबतच ज्वारी व हिवाळी सूर्यफूलाची अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे, पण तीळ, जवस आदी गळीत पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही.
विदर्भात रब्बी पिकांच्या पेरणीत बुलढाणा जिल्हा आघाडीवर आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्य़ात पेरणीला प्रारंभ झाला आहे. वाशीम व अकोला जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी अजूनही पेरणी सुरू केलेली नाही. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा आघाडीवर आहे. नागपूरव वर्धा जिल्ह्य़ातही पेरणी अत्यंत मंद गतीने सुरू आहे. धान पट्टय़ातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. विदर्भात सोयाबीनच्या मळणीचे काम वेगात सुरू आहे. तूर पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असून लवकर रोवणी झालेल्या हलक्या जातीच्या धानाची कापणी सुरू आहे. उशिरा रोवणी झालेले पीक पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.
रब्बी पिकांच्या पेरणीची विभागनिहाय टक्केवारी
अमरावती – ७, नागपूर – ५, कोल्हापूर -६१, पुणे – ५०, कोकण – ३०, लातूर -२६, नाशिक – ३