शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी एस. एन. उजगरे व उपशिक्षण अधिकारी एन. जी. कांबळे यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी ठाकरे यांना निलंबित करण्याची मागणी कांबळे व शिक्षण विस्तार अधिकारी एन. जी. नागरे यांच्यासह १३जणांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ठाकरे यांनी बुधवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक विभाग कार्यालयात त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. तेथे असलेल्या उजगरे व कांबळे या दोघा अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांचे कक्ष बंद करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यासोबत असलेल्या शिक्षक संघटनेचे सभासद, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवीगाळ करून अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून अनधिकृत काम करण्यास भाग पाडत असल्याची तक्रार केली. दरम्यान, या प्रकरणी ठाकरे यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘सीईओं’ना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.