मराठय़ांचा अटकेपार झेंडा फडकवणारे श्रीमंत पेशवे रघुनाथराव यांच्या कोपरगाव येथील वाडय़ाची दैना काही फिटेना. पेशवाईतील वैभवाची साक्ष असलेल्या या वाडय़ाच्या नुतनीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांंपासून ठप्प झाले आहे. ही कामे तातडीने सुरू न झाल्यास नजिकच्याच काळात पेशवाईचा मूक साक्षीदार असलेला हा वाडा नामशेष होण्याचीच शक्यता अधिक आहे.  
श्रीमंत पेशवे रघुनाथराव तथा राघोबादादा आणि आनंदीबाईंचे वास्तव्य दक्षिण गंगा गोदावरीकाठी कोपरगाव शहरात होते. नजरकैद म्हणुन त्यांना येथे ठेवण्यात आले होते. सन १७८२ मध्ये येथेच त्यांचे निधन झाले, गोदाकाठी हिंगणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पेशवाईतील एक मातब्बर सेनापती ज्या वाडय़ात वास्तव्याला होता, तो वाडा केवळ कोपरगाव शहरच नव्हे तर मराठेशाहीच्या वैभवाचा एक मानबिंदू मानला जातो. याच वाडय़ाची आता दैनावस्था झाली आहे. इतिहासप्रेमींना त्याचे शल्य असून संबंधीत यंत्रणा मात्र सुस्त आहेत. या वाडा मूळ रूपात जतन व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही पदरी निराशाच आली आहे.      
शहरातील गावठाण भागात हा चौसोपी वाडा आहे. राघोबादादा नजरकैदेत होते तरी, या वाडय़ाने त्यानिमित्ताने मराठेशाहीचे मोठे वैभव पाहिले. राघोबादादांचे अनेक महत्वाचे निर्णय याच वाडय़ात झाले. नाशिकच्या पुरातत्व विभागाने वाडय़ाला नवी झळाळी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे कामही सुरू झाले. मूळ रचनेला धक्का न लावता हे नुतनीकरण करण्यात येणार होता. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्रीकांत घारपुरे व जतन सहायक रमेश कुलकर्णी या दोघांवर ही जबाबदारी टाकण्यात आली होती, मात्र ते इकडे फिरकलेच नाही.
अमळनेर चेतन शहा यांनी या कामाचा ठेका घेतला आहे. तीन वर्षांपुर्वी त्यांनी वाडा पाडला, पुढच्या कामाला मात्र त्यांनी बगल दिली. हे वाडय़ाच्या नुतीनकरणाचे काम आहे की वाडा पाडण्याचे. याचाच बोध आता कोपरगावकरांना होईनासा झाला आहे. ठेकेदाराने वर्षभरापुर्वी येथे ट्रकभर लाकडे आणून टाकली, मात्र पुढची कामे ठप्प आहेत. याबाबतची माहितीही दिली जात नाही. ४९ लाख रूपये खर्चून वर्षभरापुर्वी वाडय़ाच्या अध्र्या भागाचे थातूर-मातूर काम करण्यात आले, पुढे कोठे माशी िशकली हे समजत नाही. माहिती अधिकारातील कार्यकत्रे संजय काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र पुरतत्व विभागाने अद्यापि त्यांना दाद दिलेली नाही. नाशिकच्या पुरातत्व कार्यालयासमोर आता उपोषण करण्याचा इशारा त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. वाडय़ाच्या सभोवती मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणेही झाली असून ती काढण्याचा आदेश न्यायालयाने देऊनही त्याचीही कार्यवाही टाळली जात आहे.