आम आदमीने संधी दिली तर लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बठकीत सांगितले. भ्रष्ट मार्गाने पसे मिळविण्यासाठीच राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी संघटनेतून वेगळी चूल मांडल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
शेतक-यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढण्याची आपली तयारी होती, मात्र राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी संघटनेचा वापर स्वहितासाठी करण्याचे प्रयत्न केल्याने आपले पटले नाही असे सांगून ते म्हणाले, शेतक-यांच्या जिवावर भ्रष्ट कारभार करणा-यांची घाण स्वच्छ करण्यासाठी आपण आम आदमी पक्षाचा झाडू हाती घेतला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रकरणे आता उघडकीस येऊ लागली आहेत.  शेट्टी यांच्या कारभाराची चौकशी व्हायला हवी. भारतीय पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा हात धरल्याने व त्यांची जी अवस्था आज झाली आहे तीच अवस्था भविष्यात राजू शेट्टी यांची होणार आहे.
शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने जे वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले, त्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत विरोधी पक्षही ठामपणे कोणतीही भूमिका घेत नसल्याने आपण आपच्या मदतीने शेतक-यांचा प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.  हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरुद्ध मदानात उतरण्याची आपली तयारी आहे असेही रघुनाथ पाटील यांनी या वेळी सांगितले.