काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी अकार्यक्षम असल्यामुळे आगामी २०१४ च्या निवडणुका बघता काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली. मुस्लिमांना खुश करण्यासाठी काँग्रेस सरकारने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला.
दीनदयाल शोध संस्थानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उमा भारती नागपुरात आल्या असता  पत्रकारांशी बोलत होत्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांना समोर केले असले तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला आलेल्याअपयशामुळे त्यांच्याकडे अकार्यक्षम नेते म्हणून बघितले जाते. राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. उत्तरप्रदेशमध्ये अमेठी आणि रायबरेली या जिल्ह्य़ांत काँग्रेसच्या उमेदवाराचा  पराभव झाला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला काही फायदा होणार नाही, अशी टीका त्यांनी  केली.
डॉ. प्रवीण तोगडिया यांनी प्रक्षोभक विधान केल्याच्या कारणावरून काँग्रेसने मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्याच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अटक केल्यामुळे मुस्लिम नाराज झाले होते, त्यांना खुश करण्यासाठी तोगडियांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तोगडियांना अटक करण्यात आली तर त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा उमा भारती यांनी दिला. राम मंदिराचा मुद्दा भारतीय जनता पक्षाचा नाही तर जगभरातील हिंदू समाजाचा आहे. राम मंदिर हा हिंदूच्या अस्मितेचा आणि आस्थेचा विषय आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अजेंडय़ावर तो सुरुवातीपासून आहे. विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत निवडणुका लढविल्या आहेत. कुंभमेळामध्ये संताच्या बैठकीत राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. मंदिराच्या जागेबाबत वाद आहे. काही मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला असताना देशातील काही उग्रवादी मुस्लिमांना हाताशी धरून काँग्रेस धर्माच्या नावाखाली राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.  भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पदाचा राजीनामा देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाढेरा यांच्यावर आरोप करण्यात आलेले असताना कुठलीही चौकशी न करता त्यांना निर्दोष सिद्ध केले. काँग्रेसचे सरकार असल्यामुळे त्यांनी ते केले. मात्र गडकरी यांनी आरोप सिद्ध होईपर्यंत कुठल्याही पदावर राहून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, तो समाजासाठी आदर्श आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव समोर असले तरी भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी या संदर्भात निर्णय घेतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून जेडीयू सुरुवातीपासून भाजपसोबत आहे आणि राहणार आहे. मोदींचे नाव समोर केले तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विरोध आहे असे वाटत नाही, असेही उमा भारती म्हणाल्या.  
गडकरी व वैद्य यांच्याशी चर्चा
दरम्यान, उमा भारती यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आगामी २०१४ च्या निवडणुका आणि विविध राजकीय घडामोडींसंदर्भात दोन तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा.गो. वैद्य यांच्याही निवासस्थानी जाऊन चर्चा केली.