भाजपचे पंतप्रधानपदाचे घोषित उमेदवार नरेंद्र मोदी व कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वध्र्यातून करतांना घेतलेल्या सभांबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहे.
पंधरवडय़ाच्या अंतरात एकाच परिसरात या दोन नेत्यांच्या सभा वर्धेत पार पडल्या. लाखालाखाच्या सभा पाहणाऱ्या नरेंद मोदींना वर्धेची त्यांची सभा त्यांच्या दृष्टीने निराशाजनक वाटली होती. ३० ते ४० हजाराची गर्दी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करून अशा सभेमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची टिपण्णी त्यांनी स्थानिक नेत्यांजवळ खाजगीत व्यक्त केली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हात मंडपाशिवाय बसलेल्या श्रोत्यांची तेवढी गर्दी स्थानिक नेत्यांना मात्र समाधान देऊन गेली.
आजची राहुल गांधींची सभाही दुपारच्या उन्हातच झाली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा सुरू झालेल्या या सभेतील शामियानाचा परिसर वेळेवर तुडूंब भरला. मात्र, त्यापूर्वीचे दोन तास सागर मेघेंसह सर्वाना चिंतेत टाकणारे ठरले होते. नियोजित साडे दहा वाजताची वेळ असतांना व्यासपीठापुढील परिसर निर्मनुष्य होता. सागर मेघेंच्या कपाळावर आठय़ा उमटू लागल्या. त्यावेळी त्यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, आमच्या बाहेरगावावरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बसेस एक किलोमीटर अंतरावर अडवून ठेवण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेमुळे घेण्यात आलेली अशी खबरदारी पुढाऱ्यांच्या पोटात गोळा उढवून गेली, पण हळूहळू चित्र बदलत गेले. तासाभरानंतर गर्दीचे लोंढेच उलटले. शामियाना तुडूंब भरला. अनेक जण तर रस्त्यावरच ताटकळले. अपेक्षित ५० हजाराची गर्दी झाल्याचे कांॅग्रेस नेते सांगतात. पालकमंत्री राजेंद्र मुळक हे याविषयी प्रतिक्रिया देतांना म्हणाले, मी स्वत: व्यासपीठावरून चित्र पाहिल्याने ही गर्दी ५० हजारावर असल्याचे स्पष्ट होते. कार्यकर्त्यांची असंख्य वाहने वेळेपर्यंत पोहोचू शकली नाहीत. अन्यथा गर्दीचा विक्रम मोडला असता, असे मुळक म्हणाले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे म्हणाले, मोदींच्या सभेच्या तुलनेत कॉंग्रेसच्या आजच्या सभेत एक तृतीयांशच लोक उपस्थित होते.
प्रतिसाद लाभला नाही. अशी दोन्ही पक्षांची परस्परविरोधी नोंद आहे. गर्दी जमविण्यात वाक्बगार मेघे परिवाराचे आजचे गणित सुरुवातीला चुकलेच. सतत पुढे पुढे करणाऱ्या चेलेचपाटय़ांवर आज टाकलेला विश्वास फ सवा ठरला. मात्र, त्यांच्या खास चमूने वेळेवर कार्यकर्त्यांच्या बसेस सभास्थळी पोहोचविण्यात मिळवलेले यश, तसेच पालकमंत्री मुळक यांनी लोकांना कठडय़ाच्या आत सोडण्याचे पोलिसांना जाहीरपणे केलेले आवाहन कामात आले. उशिरा सुरू झालेली सभा शेवटी पथ्यावरच पडली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही गर्दीची दखल घेतली. मात्र, नरेंद्र मोदी व राहुल गांधीच्या सभा या आगामी दहा दिवसात काय परिणाम साधतात, यावरून चर्चेला उधाण आले आहे.