श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळया गावात बऱ्याच दिवसांनी देशी-विदेशीसह गावठी दारूच्या अड्डय़ांवर छापे पडले. कुणाच्या घरात, तर कुणाच्या घराच्या आडोशाला दारूची विक्री चालत होती. काहीजणांना अटक करण्यात आली, तर बरेचजण पसार झाले.
पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पवार, शिवाजी फाटके, नवनाथ बर्डे, उत्तम भोसले आणि रवींद्र बर्डे आदींनी हे छापे घातले. खैरी निमगाव येथील संजय कारभारी झुरळे यांच्याकडून देशी-विदेशी दारूच्या १० बाटल्या, कमालपूर येथील संदीप मच्छिंद्र गायकवाड याच्याकडून १० लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. पढेगाव येथील अलकाबाई नवनाथ ऊर्फ केरू काळे हिच्या ताब्यातून १५ लिटर गावठी दारू, माळेवाडी येथील सोमनाथ कचरू बनसोडे याच्याकडून ऑफिसर चॉईसच्या ९ बाटल्या, तर खानापूर येथील कुसूमबाई भानुदास गायकवाड हिच्या ताब्यातून १० लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. श्रीरामपूर तालुका हद्दीतील अनेक गावे देशी-विदेशी आणि गावठी दारूच्या बेकायदा धंद्यांसाठी प्रसिद्ध असून या धंद्यातील महिनाभरातील उलाढाल दोन लाखांच्या आसपास आहे, अशी चर्चा यानिमित्ताने ऐकायला मिळाली.