05 March 2021

News Flash

घोटीतील तांदुळ गिरण्यांवर छापे

इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली कमी प्रतीच्या तांदळात सुगंधीत पावडर भेसळ करून विक्री होत असल्याविषयी ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्याची गंभीर दखल

| May 1, 2013 02:28 am

इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली कमी प्रतीच्या तांदळात सुगंधीत पावडर भेसळ करून विक्री होत असल्याविषयी ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत घोटी परिसरातील तीन तांदूळ गिरण्यांवर छापे टाकून नमुने घेतले. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईमुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी बंद केलेल्या तांदूळ गिरण्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उघडल्या नाहीत. पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सूचित केले आहे.
सर्वाधिक तांदळाची निर्मिती करणाऱ्या घोटी शहरातील गिरण्यांमधून अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांच्या डोळ्यात धुळफेक करत बनावट सुगंधी तांदळाची निर्मिती होत असल्याची बाब स्पष्ट झाली होती. प्रती बासमती समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नामक तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधित पावडर टाकून हेच तांदूळ इंद्रायणी असल्याचे भासवून अनेक महिन्यांपासून राज्यातील बाजारपेठेत पाठविला जात होता. त्याबद्दल अन्न व औषध प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे पुढे आले होते.
या पाश्र्वभूमीवर, या विभागाच्या पथकाने घोटीतील गिरण्यांवर छापे टाकले.
घोटी शहरातील एस. कुमार, बी. के. पिचा आणि राजेंद्र चुन्नीलाल भंडारी या गिरण्यांचा त्यात समावेश आहे. या गिरण्यांची सखोल तपासणी करून तेथील तांदळाचे नमुने घेण्यात आले आहेत. या कारवाईची माहिती समजल्यानंतर व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने गिरण्या बंद करून पोबारा केला.
भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या ईगतपुरी तालुक्यात तांदूळ निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणात गिरण्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा अधिक उत्पादन देणाऱ्या संकरीत भात बियाणाच्या लागवडीकडे कल असतो. इंद्रायणी नामक वाण दहा वर्षांपूर्वी तालुक्यात दाखल झाले. प्रचंड सुगंध व भरघोस उत्पन्न यामुळे या तांदुळाला सर्व ठिकाणाहून मागणी वाढली.
तालुक्यातील पिकाचे लागवड क्षेत्रही वाढले. गत दोन वर्षांत बेमोसमी पाऊस व अतिवृष्टी यामुळे पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊन भाताचे उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाले तरी मागणी तेवढीच आहे. याचा फायदा घेत साध्या व हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधीत रासायनिक पावडर भेसळ करून इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे दिसत होते.
 या पद्धतीने साध्या तांदळाची इंद्रायणीच्या नावाखाली विक्री करून ग्राहकांची फसवणुकीचा प्रकार कित्येक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:28 am

Web Title: raid on rice factories in ghoti
Next Stories
1 ‘आरटीओ’ व पोलिसांची अनास्था अपघातांना कारणीभूत
2 इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव
3 ‘नाशिप्र’तर्फे कृतज्ञता सोहळा
Just Now!
X