जागेच्या अडचणीमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील टर्मिनन्स प्रकल्प साकार होण्यात अडचणी असताना ठाकुर्ली स्थानकाजवळील खाडीकिनारी सध्या बंद अवस्थेत असणाऱ्या चोळे वीज प्रकल्पाच्या जागी गॅसवर आधारित वीज प्रकल्पच राबविण्याचा निर्णय घेऊन रेल्वे प्रशासनाने एकप्रकारे मुंबईकर प्रवाशांच्या सोयी-सुविधांशी आपल्याला कोणतेही सोयरसुतक नाही, हेच दाखवून दिलेले आहे. डोंबिवली-कल्याण स्थानकांदरम्यान खाडीकिनारी रेल्वेने प्रस्तावित केलेला गॅस वीज प्रकल्प केवळ अव्यवहार्यच नसून लगतच्या डोंबिवलीतील दाट लोकवस्तीसाठी धोकादायकही आहे. २०१०-११च्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा झाली, मात्र गेल्या तीन वर्षांत या प्रकल्पासाठी लागणारा गॅस कुठून आणायचा हेही निश्चित झाले नाही. येथील खाडी पात्र उथळ असल्याने गॅस वाहून आणणारी मोठी जहाजे येथे आणता येणार नाहीत. उरणमधून गॅस आणायचा म्हटला तरी तशी पाइपलाइन उपलब्ध नाही. एवढे द्राविडी प्राणायाम करून प्रकल्पाचे काम रेटलेच, तर त्यासाठी अंदाजे पाच ते सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय सध्या रेल्वे ज्या किमतीला वीज विकत घेतेय, त्यापेक्षा येथील वीज महाग असेल. त्यामुळे असा आतबट्टय़ाचा व्यवहार करण्यापेक्षा येथील ११२ एकर जागेवर वीज प्रकल्पाऐवजी कल्याण टर्मिनन्स उभारणेच व्यवहार्य ठरणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांचे म्हणणे आहे. कारण वीज प्रकल्पाच्या तुलनेत टर्मिनन्स कितीतरी कमी खर्चात होईलच, शिवाय त्यामुळे रेल्वेला उत्पन्नही मिळू शकणार आहे.
कल्याण मुंबईचे नवे प्रवेशद्वार  
वाहतूक हे रेल्वेचे मुख्य काम आहे. वीजनिर्मिती करणे नव्हे. त्यादृष्टीने विचार करता या जागी कल्याण टर्मिनन्स उभारणेच जास्त सोयीचे ठरेल, असे मत स्थानिक खासदार आनंद परांजपे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले. आपण सुरुवातीपासूनच येथे प्रस्तावित गॅस वीज प्रकल्पास विरोध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात आता कल्याणच्या पुढील शहरे अधिक वेगाने वाढत आहेत. त्यामुळे जंक्शन स्थानक असणाऱ्या कल्याण स्थानकात टर्मिनन्स उभारले तर ते मुंबईचे प्रवेशद्वार ठरेल. लांब पल्ल्याच्या गाडय़ा येथूनच ये-जा करू शकतील. त्याला पनवेल तसेच विरार उपनगरी रेल्वे मार्गाची जोड दिली तर मुंबईतील उपनगरी गाडय़ांवरील भार कितीतरी हलका होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे आपण वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.