केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकेल, अशी माऊंटन रेल अर्थात फ्युनिक्युलर सर्व अडथळे पार करून मलंग गडावर नव्या वर्षांत धावू लागेल. दार्जिलिंग आणि माथेरानच्या डोंगररांगांना वळसा घालून धावणारी गाडी आपल्याला परिचित आहे, पण फ्युनिक्युलर नामक ही गाडी थेट डोंगर चढून जाणार आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तीन महिने या प्रकल्पाचे काम रखडल्याने नियोजित वेळापत्रकापेक्षा काहीशा उशिराने म्हणजे जून महिन्यात मलंग गडावर दिमाखात ही रेल्वे गाडी धावू शकेल, अशी माहिती हा प्रकल्प साकारणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचे सरव्यवस्थापक झेड. एन. शेख यांनी दिली.
‘बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा’ (बी.ओ.टी.) या तत्त्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर सप्टेंबर २०१२ मध्ये वन खात्याने ही जागा प्रकल्पासाठी हस्तांतरित केली. करारानुसार दोन वर्षांत म्हणजे २०१४ च्या सप्टेंबपर्यंत प्रकल्प साकारण्याची मुदत आहे. प्रत्यक्षात दीड वर्षांतच प्रकल्प पूर्ण करून जानेवारी महिन्यात पर्यटकांना नववर्षांची भेट देण्याची कंपनीची योजना होती. मात्र मुसळधार पावसामुळे दोन-अडीच महिने प्रकल्पाचे काम रखडले होते. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यापासून कामाने वेग घेतला असून मेअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला आहे.
अशी असेल गाडी..
मलंग गडाच्या पायथ्याशी वाडी गावात या गाडीचा फलाट उभारण्याचे काम सुरू आहे. इथून सव्वा किलोमीटर लांबीचा डोंगर चढून ही ट्रेन माथ्यावरील स्थानकात येईल. त्यासाठी तिला जास्तीत जास्त दहा मिनिटे लागतील. सध्या मलंग गडावर पायी चालून जाण्यास पाऊण ते एक तास लागतो. उभारण्यात येत असलेल्या शंभर खांबांवरील रुळांवरून ही रेल्वे चढ-उतार करेल. सध्या त्यापैकी ६५ खांब उभारण्यात आले आहेत. रूळ मार्ग एकच असला तरी मध्ये ५० मीटरचा पासिंग लुक असेल. या मार्गावरून प्रत्येकी तीन डब्यांच्या दोन ट्रेन्स प्रवासी तसेच माल वाहतूक करतील. त्यातील एक डबा सर्वसाधारण वर्गासाठी, दुसरा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी, तर तिसरा स्वतंत्र डबा सामानासाठी असेल. प्रत्येक डब्यात कमाल ६० प्रवासी बसू शकतील. प्रवाशांच्या संख्येनुसार या ट्रेनच्या फेऱ्या होतील. या प्रकल्पासाठी अंदाजे ४५ कोटी रुपये खर्च होईल, अशी अपेक्षा असून प्रवासी भाडे ९० ते शंभर रुपये असणार आहे. डोंगर चढून जाणाऱ्या भारतातील या पहिल्यावहिल्या रेल्वेतून सैर करायला देशभरातून पर्यटक येथे येतीलच. शिवाय सध्या मलंग गडावरील रहिवासी तसेच येथील दग्र्याला भेट देणाऱ्या भाविकांचीही त्यामुळे सोय होणार आहे.  
पावसाळ्यातही धावणार
माथेरानची मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद असते. मलंग गडावरील फ्युनिक्युलर मात्र पावसाळ्यातही धावणार आहे. किंबहुना पावसाळ्यात या ट्रेनमध्ये बसून अगदी जवळून धबधबे पाहता येणार आहेत.