रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बनावट न्यायालयात उभे करून बनावट जातमुचलक्याद्वारे त्यांची लूट केल्याच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने चपराक लगावल्यानंतर अखेर ३१ जानेवारी रोजी ‘आपीएफ’च्या चार पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
गुन्हा दाखल करून दीड वर्ष उलटले तरी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. त्यामुळे गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चपराक लगावत आरोपपत्र दाखल करणार की नाही, अशी विचारणा केली होती. जनहित याचिकेद्वारे समीर झवेरी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. मूळ प्रकरणाचा तपास करताना नवीन प्रकरणे पुढे आल्याने अद्याप आरोपपत्र दाखल केले नसल्याचे सीबीआयकडून मागील सुनावणीच्या वेळेस सांगण्यात आले होते. सीबीआयच्या उत्तराने संतापलेल्या न्यायालयाने तपासात नवे खुलासे होतच राहणार. म्हणून तुम्ही आरोपपत्र दाखल करणार नाही का, असा सवाल केला होता. तसेच आरोपपत्र दाखल करणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी त्यावर सुनावणी झाली असता सीबीआयच्या वतीने अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल केविक सेटलवाड यांनी येत्या ३१ जानेवारी रोजी चार ‘आरपीएफ’ पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.