फेब्रुवारी-मार्च हे दोन परीक्षांचे महिने संपल्यानंतर येणाऱ्या सुटय़ांच्या मोसमासाठी फेब्रुवारी-मार्चपासूनच रेल्वेचे आरक्षण करायला सुरुवात होते. मात्र सध्या आरक्षणासाठी भल्या पहाटे तिकीट खिडक्यांवर रांगा लावून किंवा ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी वेळेआधी पंधरा मिनिटे लॉगइन करूनही प्रवाशांच्या नशिबी ‘प्रतीक्षा यादी’च असल्याचे चित्र आहे. यासाठी दलालांच्या हाती आलेले अद्ययावत सॉफ्टवेअर कारणीभूत आहे. बनावट आयपी अ‍ॅड्रेस तयार करून त्याद्वारे आरक्षण सुरू होताच काही क्षणांतच तिकीट आरक्षित करण्याचा खेळ काही दलालांनी मांडला आहे. हा खेळ रेल्वे सुरक्षा दल आणि दलालविरोधी पथक उघडा पाडत असले, तरी त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच अडवणूक झाली आहे. अशा तिकिटासाठी दलाल तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा ५०० ते १२०० रुपये जास्त आकारत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने काही दलालांना अशा प्रकारे तिकिटे काढताना अटक केली.
दलाल काय करतात ?
भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे केटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)तर्फे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम म्हणजे प्रवासी आरक्षण प्रणाली राबवली आहे. या प्रणालीद्वारे भारतातील कोणत्याही ठिकाणाहून कोणतेही तिकीट काढणे सहज शक्य होते. सर्व देशात एकाच वेळी कार्यान्वित होणाऱ्या या प्रणालीमध्ये शिरून अद्ययावत सॉफ्टवेअरच्या मदतीने काही क्षणांतच तिकीट काढण्याचे कौशल्य दलालांनी हस्तगत केले आहे. त्यासाठी दलालांना अद्ययावत सॉफ्टवेअर पुरवण्यात येते. हे सॉफ्टवेअर दलालांना दरमहा पाच ते दहा हजार रुपये एवढय़ा भाडेतत्त्वावर देण्यात येते. या सॉफ्टवेअरच्या आधारे दलाल भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीत शिरकाव करतात. ही प्रणाली देशभरात दर सकाळी कार्यान्वित होण्याआधीच दलालांनी या प्रणालीचा काही प्रमाणात ताबा घेतलेला असतो. मग तिकीट आरक्षणे सुरू होताच काही सेकंदांतच या अद्ययावत सॉफ्टवेअरच्या आधारे दलाल तिकीट आरक्षित करतात.
दलालांची चांदी, प्रवाशांना फटका
आरक्षण सुरू झाल्या झाल्या काही सेकंदांतच तिकिटे आरक्षित होत असल्याने इमानेइतबारे आपल्या घरून आयआरसीटीसीच्या आयडीवरून लॉग इन करणाऱ्या किंवा तिकीट खिडकीवर उभे राहून आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या हाती प्रतीक्षा यादीतील तिकिटे पडतात. ही तिकिटे निश्चित होतील की नाही, याचीही शाश्वती नसते. मात्र दलालांकडे प्रत्येक गाडीची अगदी निश्चित झालेली तिकिटे असतात. ही तिकिटे दलाल मूळ किमतीपेक्षा ५०० ते १२०० रुपये जास्त किंमत आकारून विकतात. परिणामी, हाती तिकीट नसलेल्या प्रवाशांना तिकिटासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे.
कारवाई कशी?
अशा प्रकारे सॉफ्टवेअरचा वापर करून तिकीट आरक्षण होत असल्याचा सुगावा रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या दलालविरोधी पथकाला लागला. त्यानंतर या पथकाने तातडीने कारवाई करत विविध ठिकाणांहून चार दलालांना अटक केली. यात रामकृष्ण झा, रामदास बुऱ्हाडे, अजितकुमार कुशवाह आणि प्रदीप शर्मा यांचा समावेश आहे. या चौघांकडून रेल्वेने साडेपाच लाख रुपयांहून अधिक रकमेची तिकिटे हस्तगत केली. या तिकिटांची संख्या २२३ आहे. त्याशिवाय मालाड येथे प्रदीप शर्मा याच्या केंद्रावर मारलेल्या छाप्यात एक लॅपटॉप, तीन मोबाइल असे साहित्यही हस्तगत केले.
दलालांना कसे रोखणार ?
सॉफ्टवेअरच्या आधारे रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत शिरकाव करणाऱ्या दलालांना अटकाव करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात सुधारणा करण्याची गरज अनेक रेल्वे अधिकारीच बोलून दाखवतात. हे संकेतस्थळ इतर कोणीही हॅक करू नये, किंवा दलालांना तेथे शिरकाव करता येऊ नये, यासाठी ‘फायरवॉल’सारखी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. शेअर बाजाराप्रमाणे या संकेतस्थळावरही बनावट आयपी अ‍ॅड्रेसचा वापर होणार नाही, अशी तजवीज करायला हवी. त्यासाठी आयआरसीटीसीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही आयआरसीटीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
आरपीएफ मागावरच!
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळामधील प्रणालीत अशा प्रकारे शिरकाव करून तिकिटे काढणाऱ्या आणि ती तिकिटे प्रवाशांना चढय़ा दराने विकणाऱ्या दलालांना अटकाव करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल स्वतंत्र मोहीम राबवत आहे. अशा प्रकारे चढय़ा दराने तिकिटे विकत असल्याचे प्रकार प्रवाशांना आढळल्यास प्रवाशांनीही आरपीएफच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी आलोक बोहरा यांनी सांगितले.