News Flash

मुंबईकरांना रेल्वेतर्फे नववर्षांची नवीन भेट

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात सुरू झालेली मोबाइल तिकीट यंत्रणा नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून विस्तारणार आहे.

| January 2, 2015 02:32 am

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात सुरू झालेली मोबाइल तिकीट यंत्रणा नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून विस्तारणार आहे. सुरुवातीला फक्त मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकापर्यंतच मर्यादित असलेल्या या सेवेला प्रवाशांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून आठ स्थानकांवर या सेवेचा विस्तार केला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावर मिळून दहा स्थानकांवर ही सेवा उपलब्ध होईल. या आठ स्थानकांमध्ये महत्त्वाच्या स्थानकांचाच समावेश करण्यात आला असून उर्वरित स्थानकांसाठीही ही सेवा चालू करण्याच्या दृष्टीने रेल्वेचे आणि ‘क्रिस’ या संस्थेचे प्रयत्न चालू असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोर रांगेत उभे राहण्याच्या कटकटीपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने आपल्या मोबाइलमधून तिकीट काढणे प्रवाशांना शक्य झाले आहे. मात्र या मोबाइल तिकिटाची छापील प्रत घेण्यासाठी प्रवाशांना एटीव्हीएम यंत्रासमोर रांगेतच उभे राहावे लागत असल्याची अडचण आहे. सुरुवातीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ही सेवा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातच सुरू करण्यात आली.
मात्र, २७ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या यंत्रणेच्या मदतीने २९ डिसेंबपर्यंत फक्त ५९ तिकिटेच काढण्यात आल्याचे समोर आले होते. त्यातून रेल्वेला मिळालेले उत्पन्नही नगण्य होते. मध्य आणि पश्चिम मार्गावर दर दिवशी ७५-८० लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या २० लाखांच्या पुढे आहे. इतर प्रवासी मासिक-त्रमासिक पासधारक आहेत. या २० लाखांपैकी फक्त ५९ प्रवाशांनीच या तिकीट यंत्रणेचा वापर केल्याने रेल्वे प्रशासनही चिंतेत होते.
आता मध्य रेल्वेवर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि वाशी; तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवरील प्रवाशांनाही मोबाइल तिकीट यंत्रणेचा लाभ घेता येणार आहे.
मोबाइल तिकीट यंत्रणा सुरुवातीपासूनच दोन्ही मार्गावरील दहा स्थानकांवर सुरू करण्याचा आमचा मानस होता. मात्र लोकार्पण सोहळ्यानंतर फक्त दादर स्थानकावरच ही यंत्रणा सुरू झाली.
आता मात्र दोन्ही मार्गावरील दादर स्थानक धरून आम्ही दहा स्थानकांत ही सेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आता टप्प्याटप्प्याने इतर स्थानकांवरही ही सेवा लागू करण्यात येणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल तिकीटे मिळण्याची स्थानके
मध्य रेल्वे     –
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि वाशी;  
पश्चिम रेल्वे –
चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी आणि बोरिवली   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:32 am

Web Title: railway gifts for commuters on occasion of new year
टॅग : Local Train,Railway
Next Stories
1 पारा घसरल्याने वेताळाला हुडहुडी
2 २०१५
3 वातानुकूलित लोकल, स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग आणि स्थानकांच्या विस्ताराचे वर्ष
Just Now!
X