गावाला जाण्यासाठी कल्याण स्थानकात तिकीट काढले.. मात्र ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’हून (एलटीटी) सुटणारी गाडी पकडणे शक्य झाले नाही.. तिकिटाचे पसे परत घेण्यासाठी कल्याण स्थानकात गेलो, तर तेथे ‘एलटीटी’ला जाऊन पसे परत घ्या, असे सांगण्यात आले.. त्यामुळे तिकिटाचे पैसे परत मिळविण्यासाठी नाइलाजाने कल्याण ते एलटीटीपर्यंतचा प्रवास करावा लागला.. राजेशकुमार चौरसिया यांना आलेला हा अनुभव सध्या कितीतरी रेल्वे प्रवाशांना घ्यावा लागतो आहे. आपले काम झटपट व्हावे यासाठी तिकीट प्रणालीपासून गाडय़ांच्या घोषणांपर्यंतचे सर्व व्यवहार संगणकीकृत करणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांच्या वेळेचा होणारा हा वेळेचा अपव्यय आणि वणवण लक्षात आलेली नाही. म्हणूनच त्याऐवजी ज्या स्थानकातून तिकीट काढले आहे, त्याच स्थानकात तिकिटाचे पसे परत मिळावेत, अशी मागणी आता प्रवासी संघटना व प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.
रेल्वे प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी ‘रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडा’ साजरा करणाऱ्या रेल्वेने अनारक्षित तिकीटधारकांना मात्र काहीही दिलासा दिलेला नाही. लांब पल्ल्याच्या गाडय़ांची अनारक्षित तिकिटे काढल्यानंतर काही कारणाने प्रवास करणे शक्य झाले नाही, तर प्रवाशांना तिकिटाचे पसे परत मिळण्याची सोय आहे. मात्र पसे परत मिळवण्यासाठी गाडी ज्या स्थानकातून सुटते, त्याच स्थानकात जाण्याचे कष्ट प्रवाशांना घ्यावे लागतात.
रेल्वेने अनारक्षित तिकीट प्रणाली केंद्रांवर उपनगरीय गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे मिळतील, याचीही सोय केली आहे. त्यामुळे कोणत्याही स्थानकातून आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट काढणे शक्य होते. मात्र काही कारणांमुळे ती गाडी पकडणे शक्य झाले नाही, तर प्रवाशांना त्याच दिवशी त्या तिकिटाचे पसे परत मिळण्याचा पर्यायही आहे. मात्र त्यासाठी गाडी ज्या टर्मिनसहून सुटत असेल, त्या टर्मिनसच्या अनारक्षित तिकीट केंद्रात जावे लागते. एखाद्या व्यक्तीने परळ अथवा डोंबिवली स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाडीचे तिकीट काढले असेल आणि ती गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी असेल, तर त्या प्रवाशाला त्याने न केलेल्या प्रवासाच्या तिकिटाचे पसे परत मिळवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते.
रेल्वे म्हणते..
पसे परत मिळवण्याच्या या पद्धतीत गोंधळ होतो. अनेकदा प्रवासी प्रवास करूनही पसे परत मागण्यासाठी येतात. हा गोंधळ टाळण्यासाठी प्रवाशांची गाडी चुकल्यास त्यांनी गाडी ज्या टर्मिनसहून सुटली आहे, तेथेच जाऊन पसे परत मिळवा, असा नियम करण्यात आला.
 नरेंद्र पाटील,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रवासी म्हणतात..
हा निर्णय प्रवाशांसाठी अडचणीचा आहे. रेल्वेने आपली सर्व तिकीट प्रणाली संगणकीकृत केली आहे. मग कोणत्याही स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट मिळणे शक्य होत असेल, तर त्या तिकिटाचे पसे त्याच स्थानकात परत देण्यास काय हरकत आहे? रेल्वेने यात तातडीने सुधारणा करायला हवी.
नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ