लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी घाऊक आणि दर्जेदार जेवण तयार करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने चालू केलेल्या ‘बेस किचन’चा फायदा प्रवाशांना कितपत होतो, हा संशोधनाचा विषय असला, तरी सध्या या किचनचा त्रास आसपासच्या आस्थापनांना सहन करावा लागत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील बेस किचनचा एक्झॉस्ट फॅन मागे असलेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाकडे तोंड करून आहे, तर मुंबई सेंट्रल येथील बेस किचनच्या मागे रहिवासी इमारती आहेत. या एक्झॉस्ट फॅनमधून निघणारी गरम हवा आणि त्याचा प्रचंड आवाज यामुळे रुग्णालयातील रुग्ण, वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थी आणि रहिवासी यांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत दोन्ही रेल्वे प्रशासनांकडे तक्रार करूनही अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही.
मुंबई सेंट्रल येथील बेस किचनचे उद्घाटन २०१३ मध्ये झाले, तर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेस किचन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांच्या हस्ते ८ मार्च २०१४ रोजी सुरू करण्यात आले. या दोन्ही बेस किचनमधून दर दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त लोकांसाठीचे जेवण बनवले जाते. प्रवाशांसाठी उत्तम प्रतीचे आणि स्वस्त जेवण तयार करून ते त्यांना किफायतशीर दरांमध्ये देणे, हा या बेस किचनमागचा हेतू होता.
या बेस किचनचा एक्झॉस्ट फॅन किचनच्या मागच्या बाजूला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेस किचनच्या मागील बाजूला सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये काही विद्यार्थी राहतात, तर जवळच्या इमारतींमध्ये रुग्णही असतात. एक्झॉस्ट फॅनचा प्रचंड आवाज तर होतोच; पण प्रदूषणही होते. गरम हवा आमच्या इमारतींच्या दिशेने येते. या इमारतींमध्ये अनेक विद्यार्थी राहत असल्याने त्यांना अभ्यासाच्या वेळेत त्रास होतो. तर आम्हा रहिवाशांनाही या आवाजाचा आणि उष्णतेचा त्रास होत आहे, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आवारात राहणारे सफाई कर्मचारी दगडू पडवळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जे. बी. भवानी यांनी मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे १५ मे रोजी या प्रकरणाबाबत तक्रारही केली आहे.
हे बेस किचन सध्याच्या ठिकाणी उभारण्याच्या निर्णयाला रेल्वेतीलच काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. या अधिकाऱ्यांच्या मते या किचनचा त्रास रुग्णालयाला होईल, हे स्वाभाविक होते. त्यामुळे त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या जवळील एक जागाही रेल्वेला सुचवली होती. मात्र या जागेऐवजी सध्याच्या जागेला पसंती देण्यात आली. याबाबत मुंबई विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला विचारले असता त्याने अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले. मात्र अशी तक्रार असल्यास त्याबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, असाच फटका मुंबई सेंट्रल येथील बेस किचनच्या मागील इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही बसत आहे. याही किचनच्या एक्झॉस्ट फॅनचा
आवाज प्रचंड असतो. घरी एकमेकांशी बोलताना आम्हाला बऱ्याचदा ओरडूनच बोलावे लागते, अशी तक्रार या २० मजली इमारतीतील रहिवासी करत आहेत.