प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून महिला प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या महिला विशेष तिकीट खिडकीला उत्तम प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या तीन स्थानकांवर सुरू करण्यात आलेल्या खिडक्यांसमोर महिलांच्या रांगा दिसू लागल्या. मात्र ही योजना इतर प्रमुख स्थानकांवर विस्तारण्याचा कोणताही विचार मध्य रेल्वेने केलेला नाही. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या तिकीट खिडक्यांचा प्रयोग यशस्वी होऊनही त्याची अमलबजावणी इतर स्थानकांवर केली जात नसल्याने महिला प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे.
तिकीट खिडक्यांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना विविध पर्याय दिले आहेत. त्याचबरोबर महिलांसाठीही वेगळा विचार व्हावा, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून नोव्हेंबर २०१३मध्ये मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महिलांसाठी विशेष खिडकी सुरू करण्यात आली. या खिडकीवरील प्रतिसाद पाहून डिसेंबर २०१३मध्ये ठाणे आणि कल्याण या स्थानकांवरील एक तिकीट खिडकी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली.
गेल्या सहा महिन्यांत या तिकीट खिडक्यांवर महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला ही तिकीट खिडकी सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत कार्यरत होती. मात्र महिला प्रवाशांची प्रवासाची वेळ लक्षात घेऊन ती सकाळी सात ते दुपारी तीन अशी करण्यात आली.
त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील खिडकीवर १२२०, ठाणे येथे १५६० आणि कल्याण येथील खिडकीवर ९०८ एवढी तिकिटे दर दिवशी सरासरी विकली गेली. कोणत्याही तिकीट खिडकीवर एका पाळीत साधारणपणे १२०० ते १५०० तिकिटे विकली जातात. हा आकडा लक्षात घेतला, तर या महिला विशेष तिकीट खिडक्यांची कामगिरी खूपच चांगली आहे.
या तिकीट खिडक्या सुरू करताना त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून या योजनेचा विस्तार इतर स्थानकांवरही करण्यात येईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र सहा महिने उलटून गेले, तरी ही तीन स्थानके वगळता इतर कोणत्याही स्थानकावर महिलांसाठी राखीव तिकीट खिडकी सुरू करण्यात आलेली नाही.
याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांना विचारले असता त्यांनी रेल्वेच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला रेल्वेने पुढाकार घेऊन महिनाभरातच आमच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई केली.
आम्ही त्या वेळी कल्याण, दादर, कुर्ला या स्थानकांवरही ही योजना सुरू करावी, अशी भूमिका घेतली होती. या स्थानकांवरील तिकीट रांगांमध्ये पुरुष प्रवाशांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांनी केल्या होत्या. मात्र कल्याण वगळता दादर आणि कुर्ला येथे ही योजना सुरूच करण्यात आलेली नाही, असे अरगडे यांनी स्पष्ट केले.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता या खिडक्यांना चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र अद्याप तरी या खिडक्यांच्या विस्ताराची योजना नसल्याचेही त्यांनी सांगितले.