रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधीशी बोलताना, ‘मुंबईकरांनी रेल्वेवरील भार कमी करायला हवा’, असे विधान करत मुंबईकरांना बसने प्रवास करण्याचा सल्ला दिला. या ‘अनाहूत सल्ल्या’ने मुंबईकरांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक प्रामुख्याने रेल्वे, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी या चार माध्यमातूनच होते. त्यातही रिक्षा व टॅक्सी हे पर्याय सामान्य मुंबईकरांना दर दिवशी परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा भार मुख्यत्वे रेल्वे व बेस्ट या दोहोंवरच आहे. रेल्वेमंत्र्यांचा हा सल्ला मानायचे ठरवले, तर मुंबईच्या रस्त्यांचे चित्र कसे असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
उपनगरीय रेल्वेची अवस्था
मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर सध्या ताण पडत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ७५ गाडय़ा दिवसाला १६१८ फेऱ्या मारत असूनही या फेऱ्या माणसांचा लोंढा वाहण्यास असमर्थच ठरत आहेत. एका गाडीतून साधारणपणे दीड हजार लोक प्रवास करू शकतात. मात्र सध्या एका गाडीतून साडेचार ते पाच हजार लोक प्रवास करतात, असे चित्र आहे. रेल्वेमार्गावरील सेवा वाढवण्याबाबतही बोलले जात आहे. सध्या मध्य रेल्वेवर दर साडेतीन ते चार मिनिटांनी एक सेवा चालवली जाते. हा वेळ कमी करण्यासाठी डीसी-एसी परिवर्तन, नवीन टर्मिनसची उभारणी या सर्व गोष्टींची गरज आहे. गाडय़ांचे डबे वाढवण्याचा प्रस्तावही पुढे आला असला, तरी त्यासाठी सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे खरगे यांनी दिलेला हा सल्ला उपनगरीय रेल्वे सेवेची ही अवस्था बघता योग्यच आहे.
‘बेस्ट’ची सद्यस्थिती
‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात ४२०० गाडय़ा आहेत. या गाडय़ांमधून दर दिवशी ४५ लाख लोक प्रवास करतात. यापैकी साडेतीन हजारांपेक्षा जास्त गाडय़ा दर दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर धावत असतात. मात्र लोक दीर्घ अंतरासाठी ‘बेस्ट’चा वापर न करता स्थानकापासून घरापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत जाण्यासाठी ‘बेस्ट’ला पसंती देतात. ‘बेस्ट’चे दीर्घ पल्ल्याचे मार्ग तोटय़ातच आहेत. त्यातच ‘बेस्ट’च्या वातानुकुलित सेवेलाही वार्षिक ९३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीची स्थिती
‘बेस्ट’च्या ताफ्यात चांगल्या बसगाडय़ा असूनही ‘बेस्ट’ तोटय़ात असण्याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांनी ‘बेस्ट’कडे फिरवलेली पाठ! आज मुंबईच्या रस्त्यांवर दर दिवशी ७०० नव्या गाडय़ा उतरतात. मुंबईत एका मार्गिकेतून एका तासात साधारणपणे १३००-१४०० गाडय़ा जातात. यात खासगी गाडय़ांचे प्रमाण जास्त आहे. या खासगी गाडय़ांतून सरासरी दीड-दोन प्रवासीच प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यावरील २० ते ३० चौरस मीटर जागा ही फक्त या दीड ते दोन माणसांसाठी खर्च होते, असे वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील प्रमुख रस्त्यांवरही गाडय़ा पार्क केल्याने रस्त्याचा बराचसा भाग वापरातच नसतो. रेल्वे वगळता मुंबईच्या धमन्या मानल्या जाणाऱ्या ‘लाल बहादूर शास्त्री मार्ग’, ‘स्वामी विवेकानंद मार्ग’, ‘पूर्व द्रुतगती मार्ग’, ‘पश्चिम द्रुतगती मार्ग’, ‘जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड’ आदी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे कुर्ला ते सीएसटी हे अंतर रेल्वेने पार करायला धिम्या लोकलने ३० मिनिटे लागत असताना गाडीने किंवा बसने एक ते दीड तास लागतो. सार्वजनिक वाहतुकीचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून रेल्वेची ओळख आहे. मुंबईसारख्या वेगवान शहरात रेल्वेला पर्याय निर्माण करायचा झाल्यास बससाठी राखीव मार्गिका, खासगी वाहनांना आळा, कार्यालयांच्या वेळांचे नियोजन, जास्तीत जास्त कर्मचारी राहत असणाऱ्या भागांत कार्यालयांची स्थापना असे विविध उपाय योजावे लागतील, असेही दातार यांनी सांगितले.
बेस्ट आणि एसटी
रेल्वेमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारनेही या बाबत लक्ष घालायला हवे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ा राज्यभरात वाहतूक करतात. तर शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे वाहतूक बघितली जाते. परिवहन महामंडळाला शहरांतर्गत वाहतूक करण्यास परवानगी नाही. त्यामुळे मुंबईच्या हद्दीत राहणाऱ्या प्रवाशांनी फक्त बसने प्रवास करायचे ठरवले, तर ही संख्या १५-२० लाख एवढी जास्त आहे. या प्रवासी संख्येचा भार फक्त ‘बेस्ट’वर पडेल. ‘बेस्ट’ची सद्यस्थिती पाहता एवढय़ा जादा प्रवाशांचा भार उपक्रमाला झेपता येणार नाही.
मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुकीची घनता
गाडय़ांचे प्रमाण
सुरळीत वाहतुकीच्या वेळी – १३००-१४०० गाडय़ा प्रति मार्गिका प्रति तास
वाहतूक कोंडीच्या वेळी – ३००-८०० गाडय़ा प्रति मार्गिका प्रति तास
बसचे प्रमाण
सुरळीत वाहतुकीच्या वेळी – ६०-१०० बस प्रति मार्गिका प्रति तास
वाहतूक कोंडीच्या वेळी – २५-३० बस प्रति मार्गिका प्रति तास