माळीण गावात दरड कोसळण्याची घटना घडली, त्याच दिवशी मुंबईत सँडर्हस्ट रोड स्थानकाजवळही प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचेल, असा प्रकार घडणार होता. मात्र सँडहर्स्ट रोड स्थानकातील उप स्टेशन अधीक्षकांच्या प्रसंगावधानाने हा प्रकार टळला. हार्बर मार्गाला लागून असलेल्या इमारतींपैकी एका झाडाची मोठी फांदी तुटून ती हार्बर मार्गावर पडेल की काय, अशी परिस्थिती होती. त्याची माहिती मिळताच या अधिकाऱ्याने तेथे धाव घेऊन या भागाची पाहणी केली आणि रेल्वे प्रशासनालाही कळवून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. परिणामी ही फांदी योग्य वेळी सुरक्षितपणे बाजूला करण्यात यश आले.
गेल्या महिन्यात सँडहर्स्ट रोड स्थानकाला लागून असलेल्या ‘थोरात हाऊस’ या इमारतीजवळील संरक्षक भिंतीचा काही भाग मध्य रेल्वेच्या कल्याण दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर पडला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र वाहतूक खोळंबून प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. बुधवारी संध्याकाळी डय़ुटीवर असलेले उप स्टेशन अधीक्षक विनायक शेवाळे यांना हार्बर मार्गालगत मस्जिद स्थानकाच्या बाजूला असलेल्या एका इमारतीतील झाडाबाबत माहिती मिळाली.

शेवाळे यांनी भर पावसात सदर इमारतीत जाऊन आणि रेल्वे मार्गावरून या झाडाची पाहणी केली. ही फांदी बरीच मोठी असून ती तुटल्यास थेट हार्बर मार्गावर कोसळली असती. परिणामी ओव्हरहेड वायरलाही धक्का लागला असता. तसेच ही फांदी तुटायला आणि गाडी जायला एकच वेळ झाली असती, तर प्रवाशांच्या जीवही धोक्यात आला असता. शेवाळे यांनी त्वरित रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती देत विशेष ब्लॉक देण्याची विनंती केली. प्रशासनानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अध्र्या तासाचा विशेष ब्लॉक देऊ केला.
दरम्यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. भायखळा अग्निशमन दलाचे अधिकारी सावंत यांनी ही फांदी तोडण्यासाठी तातडीने काम सुरू केले. फांदीचा कमीत कमी भाग रुळांवर पडेल, या दृष्टीने अग्निशमन दलाच्या जवानांनी फांदीभोवती दोरखंड आवळले. त्यानंतर ही फांदी तोडण्यात आली. या फांदीचा मोठा भाग रुळांवर पडला. मात्र सुदैवाने ओव्हरहेड वायरला धक्का न लागल्याने मोठे नुकसान टळले. उप स्टेशन अधीक्षक शेवाळे यांच्या या प्रसंगावधानामुळे रेल्वेचे नुकसान आणि प्रवाशांना होणारा धोका टळला.