रेल्वे तिकीट खरेदी करताना दलालांच्या कचाटय़ात सापडलेल्या प्रवाशाला आता रेल्वेने दुचाकी वाहन एखाद्या गावाला पोहोचण्यासाठी देखील दलालांचा जाच सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या दलालांना रेल्वेच्या पार्सल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून आले आहे.
रेल्वे पार्सलने दुचाकी किंवा अन्य वस्तू अन्य ठिकाणी पाठवण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालय परिसरात प्रवेश करताच दलाल तुमच्या मागे लागतात. पुण्याला दुचाकी पोहोचवण्यासाठी १६०० रुपये द्या आणि बिनधास्त व्हा. नोंदणी प्रमाणपत्र पुस्तक आणि वाहनाची चावी आमच्याकडे सोपवा. सर्व वस्तू नियोजित ठिकाणी पोहचवल्या जातील, अशी खात्री दलालांकडून दिली जाते. एखादा प्रवासी दलालांच्या जाळ्यात न अडकता पार्सल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेटल्यास, तेथे सहकार्य मिळत नाही. प्रवासी तयार नसल्यास त्याला वाहनासंबंधीच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती आणा, अमूकअमूक पत्र आणा म्हणून भांबावून सोडले जाते. वाहनाचा विमादेखील मागितला जातो. वास्तविक पाहता  नोंदणी करणाऱ्या व्यक्तीच्या नावे वाहन आहे का आणि त्याच्याकडे वाहनाचे नोंदणी पुस्तक आहे का, याची शहानिशा पार्सल कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.  हे रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती असतेच आणि त्यांच्या  असहकार्यामुळे अखेर प्रवासी दलालांच्या जाळ्यात अडकला जातो.

वाहन पार्सल करण्यासाठी अनाधिकृत लोकांकडे जाऊ नका, असे आमचे सगळ्यांना सांगणे आहे. पार्सल कार्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्यांना  रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकल्यास ते आम्ही प्रवासी आहोत, गाडीची नोंदणी करायला आलो असे सांगतात. त्यामुळे हे अनाधिकृत  लोक मुख्य पार्सल पर्यवेक्षक आणि नोंदणी लिपीक यांना प्रत्येक गाडीच्या नोंदणीमागे ५० रुपये दलाली द्यावी लागते, असे सांगत असले तरी ते ग्राह्य़ धरता येणार नाही. मात्र, पार्सल कार्यालयाच्या परिसरात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त वाढविण्याबाबत विचार करण्यात येईल.
डॉ. सुमंत देऊळकर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.

महाराष्ट्र एक्स्प्रेसने नागपूरहून पुण्याला दुचाकी वाहन पार्सल करण्यासाठी ३९२ रुपये रेल्वेचे शुल्क आणि दुचाकी वाहनाच्या किमतीच्या १ टक्के रक्कम पडते. जुने २० ते २५ हजार रुपयांचे वाहन पार्सल करण्यासाठी ६९२ रुपये खर्च येतो. दलालांमार्फत वाहन पार्सल केल्यास १६०० रुपये खर्च येतो. रेल्वे पार्सलने कोणताही वस्तू पाठवायची झाल्यास संबंधित व्यक्तीला वस्तू पॅकिंग करून आणावी लागते. अन्यथा रेल्वे कर्मचारी ती वस्तू पार्सलसाठी स्वीकारत नाही आणि नोंदणी करणारी व्यक्ती रेल्वेच्या निकषाप्रमाणे पॅकिंग करून देऊ शकत नाही.