प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील ‘दीड फुटांची जीवघेणी पोकळी’ कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला खुद्द उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमधील २४ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी १६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामाचा पहिला टप्पा मार्च २०१५ला पूर्ण होणार आहे. या टप्प्यात १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येईल. तर पुढील टप्प्यात मार्च २०१६पर्यंत उर्वरित १२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवली जाईल. उच्च न्यायालयाने रेल्वेला प्लॅटफॉर्म उंची वाढवण्यासाठी ३ वर्षांची मुदत दिली होती. घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘मोनिका मोरे’ प्रकरण घडल्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गाडय़ा यांमधील पोकळीचा विषय ऐरणीवर आला होता. या प्रश्नावर स्थानिक राजकीय नेत्यांनीही आवाज उठवत रेल्वे प्रशासनाला जेरीस आणले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रिसर्च, डेव्हलपमेण्ट अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ)ला प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिलीमीटर एवढी करण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला प्लॅटफॉर्मची उंची येत्या तीन वर्षांत वाढवण्याचे आदेश दिले.या आदेशांनुसार आता रेल्वे प्रशासन कामाला लागले असून ७६० मिमी ते ८४० मिमी या दरम्यान असलेले सर्व रेल्वे प्लॅटफॉर्म आता किमान ८२० मिमीपर्यंत वाढवण्यात येतील. त्यामुळे साहजिकच रेल्वे प्लॅटफॉर्मची किमान उंची ८२० मिमी एवढी असेल. त्यानंतर मध्य रेल्वेवरील ९ प्लॅटफॉर्मची उंची रेल्वेने ९०० मिमी एवढी वाढवली आहे. यापुढील प्लॅटफॉर्मबाबतही अशीच चाचपणी करून मग उंची किती वाढवावी, याबाबत विचार केला जाणार असल्याचे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
रेल्वेने ७४ उपनगरीय स्थानकांवरील २४ प्लॅटफॉर्मचे सर्वेक्षण करून या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यापैकी १२ प्लॅटफॉर्म या आर्थिक वर्षांत, तर १२ पुढील आर्थिक वर्षांत उंच केले जातील. त्यासाठी रेल्वे दोन आर्थिक वर्षांत मिळून १६ कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.

‘उंच’ होणारे प्लॅटफॉर्म व स्थानके
कोपर (प्लॅ.१ व २), घाटकोपर (प्लॅ.१), चेंबूर (प्लॅ.१ व २), सँडहर्स्टरोड (प्लॅ. २), शीव (प्लॅ. २, ३ व ४), ठाणे (प्लॅ.७), रे रोड (प्लॅ.२), कांजुरमार्ग (प्लॅ.१), कॉटनग्रीन (प्लॅ.२), वडाळा (प्लॅ.१)