रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जिने चढण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी ठाणे स्थानकात मॉलच्या धर्तीवर सरकत्या जिन्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी याच धर्तीवर रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट बसविण्याचे प्रशासनाचे आश्वासन मागे पडले आहे. रेल्वेच्या स्थानकांमधील गर्दीचा विचार करता अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी लिफ्टची व्यवस्था असावी, असा पर्याय सर्वात अगोदर पुढे आला होता. वेगवेगळ्या प्रवासी संघटनांना त्यासंबंधीची आश्वासनेही रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, सरकत्या जिन्यांचा शुभारंभ होताच लिफ्ट बसविण्याच्या आपल्या आश्वासनाचा रेल्वे प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्रवासी संघटना लिफ्ट बसवण्याची मागणी करत होते. मात्र ऐनवेळी रेल्वेने ही मागणी मागे सारली आणि सरकत्या जिन्यांचा आग्रह धरला. रेल्वेने केवळ संबंधित उत्पादन कंपन्यांच्या फायद्यासाठीच हा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळेच लिफ्टची मागणी मागे पडल्याचा आरोप मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी वृत्तान्तशी बोलताना केला आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मात्र कोटियन यांचा आरोप फेटाळून लावला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर गेल्या दोन महिन्यांच्या अंतराने दोन सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत डोंबिवली आणि कल्याण स्थानकांमध्येदेखील अशाच प्रकारचे जिने बसविण्यात येणार आहेत. हे सरकते जिने सध्या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून रेल्वे प्रशासनदेखील या जिन्यांमुळे फलाटांवरील गर्दी कमी झाल्याचा दावा करत आहे. असे असले तरी सरकते जिने बसवून आपले काम पूर्ण झाल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या रेल्वे प्रशासनाने या स्थानकांमध्ये लिफ्ट बसविण्याचा पर्याय मात्र बाजूला ठेवल्याने प्रवासी संघटना मात्र नाराज आहेत. रेल्वेने आतापर्यंत उत्तरेतील काही राज्यांतील रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्टचा पर्याय अवलंबला असून तेथे हा पर्याय यशस्वी झाला आहे. त्यामुळेच दादर, ठाणे, कल्याण, डोंबिविलीसारख्या रोजची प्रवासी संख्या पाच लाखांहून अधिक असलेल्या स्थानकांमध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला लिफ्टचा पर्याय देण्यात यावा, अशी मागणी रेल प्रवासी संघाच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून केली जात आहे. एकाच वेळी ५० हून अधिक प्रवासी वर आणि खाली दोन्ही दिशांना प्रवास करू शकणारे तसेच अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अवजड सामान घेऊन येणारे कुटुंबीय यांच्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असा युक्तिवाद प्रवासी संघटनांनी केला आहे. रेल्वेने या संदर्भात प्रवासी संघटनांना लेखी अश्वासन दिले नसले तरी लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासनाच्या बैठकींमध्ये रेल्वेने लिफ्टचा पर्याय अवलंबण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे म्हटले होते. मात्र ऐनवळी लिफ्टऐवजी सरकत्या जिन्यांना पसंती दिल्यामुळे लिफ्टसाठी प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या उभारण्यात आलेले सरकते जिने हे केवळ प्लॅटफॉर्मवरून पुलावर चढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. असे असले तरी त्याचा उपयोग स्टेशनातील अन्य प्लॅटफॉर्मवरील लोकांना होऊ शकत नाही. तसेच हे जिने इतर प्रवाशांसाठी खुले असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि अपंगासाठी या जिन्यांवरून गर्दीतून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लिफ्टची स्वतंत्र्य व्यवस्था असणे गरजेचे आहे, असे मत प्रवासी संघटना व्यक्त करत आहेत. सरकत्या जिन्यांच्या उत्पादन कंपन्यांनी आपल्या उत्पादनासाठी आग्रह धरल्यामुळे प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या लिफ्टसारख्या पर्यायांचा रेल्वे प्रशासनाला विसर पडल्याची टीका कोटियन यांनी केली आहे. तर रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या सुविधा या केवळ वरिष्ठांच्या दृष्टिकोनातून पहिल्या जातात. प्रवाशांना त्याचा किती फायदा आहे, याचा कोणताच विचार प्रशासन करताना दिसत नाही, असे उपनगरीय प्रवासी महासंघाचे राजेश घनघाव यांनी वृत्तान्तशी बोलताना सांगितले.
लिफ्टचा निर्णय नाही!
सरकत्या जिन्यांची अंमलबजावणी सध्या सुरू असून ठाणे स्थानकातील लिफ्टसंदर्भात अजून कोणताच निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला नाही. लिफ्टसंदर्भात कोणत्याही प्रकारचे आश्वासन रेल्वेच्या वतीने देण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली आहे.