उपनगरीय रेल्वेच्या कोणत्याही स्थानकांवरील कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट बघत उभे असताना सहज म्हणून रेल्वे रूळांवर डोकावल्यावर रूळांवर मुक्तपणे बागडणारे उंदीर पाहून किळस वाटणे, हा अनुभव जवळपास प्रत्येक प्रवाशाने घेतला असेल. वायरी कुरतडणे, बिळे तयार करताना रूळाखालील जमीन उकरणे आदी प्रतापांमुळे रेल्वेसाठीही हे उंदीर त्रासदायक ठरले आहेत. मात्र या उंदरांचा नायनाट करणे, हेदेखील रेल्वेसमोरील मोठे काम असून त्यात काही ‘प्राणीप्रेमी’ प्रवासीच अडथळा ठरत आहेत. 

आतापर्यंत रेल्वे स्थानकांवरील भटके कुत्रे हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत होते. या कुत्र्यांना खायला देणारे प्रवासी आणि हे कुत्रे त्रासदायक वाटणारे प्रवासी, यांत भांडणेही झाली होती. मात्र आता काही प्रवासी आपल्याकडील खाद्यपदार्थ सहेतूक रूळांवर टाकताना दिसतात. या प्रवाशांनी खाद्यपदार्थ टाकल्यावर लागलीच रेल्वे रूळांच्या आसपास असलेल्या बिळांमधून उंदरांचा कुटुंबकबिला बाहेर येतो आणि त्या पदार्थाचा फन्ना उडवतो. रेल्वेने आतापर्यंत या उंदरांचा नायनाट करण्यासाठी काही उपायही केले आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत.
स्टेशन परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, अशा आशयाची उद्घोषणा वारंवार केली जाते. मात्र ही घोषणा प्रवाशांकडून कधीच गांभीर्याने घेतली जात नाही. आता तर काही प्रवासी थेट उंदरांना खाणे टाकू लागल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हे उंदीर अनेकदा सिग्नल पॅनलच्या वायरी कुरतडतात. त्यामुळे या वायरी एका लोखंडी बॉक्समध्ये ठेवण्याचे प्रयत्नही झाले. उंदरांच्या या प्रतापांमुळे अनेकदा बिघाड होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचप्रमाणे रूळांखालची खडी आणि त्याखालचा मातीचा थर रेल्वेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र उंदीर बिळांसाठी ही जमीन उकरत असल्याने जमीन भुसभुशीत होते. परिणामी वाहतुकीसाठी ते धोक्याचे ठरू शकते.
प्रवाशांनी उंदरांना कोणतेही खाद्यपदार्थ खायला देऊ नयेत. तसेच खाद्यपदार्थाच्या पिशव्या किंवा फळांची आवरणे आदी गोष्टी कचरापेटीतच टाकाव्यात, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी केले आहे. उंदरांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्या प्रवाशांवर कायद्यानुसार काहीच कारवाई करता येणार नसली, तरी या प्रवाशांच्या अस्थानी दातृत्त्वामुळे रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसू शकतो. परिणामी, इतर प्रवाशांनीच अशा प्रवाशांना अडवायला हवे, असेही चंद्रायन यांनी स्पष्ट केले.
mv04