24 January 2020

News Flash

प्रवाशांच्या समस्यांवर आता रेल्वेची ‘ट्विप्पणी’

रेल्वेमार्गावर दर दिवशी होणारे बिघाड, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांची पद्धतशीर सुरू असलेली ‘कंत्राटी लूट’

| July 21, 2015 07:01 am

रेल्वेमार्गावर दर दिवशी होणारे बिघाड, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांची पद्धतशीर सुरू असलेली ‘कंत्राटी लूट’, उपनगरीय मार्गावरील दिरंगाई आणि प्रचंड गर्दी यांबाबत प्रवाशांच्या लाखो समस्या वारंवार मांडूनही त्यात फार फरक पडलेला नाही. आता याच समस्या रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना अधिक ‘सोशलाइज’ होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे सर्व अधिकारी प्रवाशांशी प्रत्यक्ष संपर्क साधणार नसून ‘आभासी दुनिये’तील ट्विटर, फेसबुक अशा सोशल नेटवìकग साइट्सवरून संपर्कात राहणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने ८ जुल रोजी दिलेल्या आदेशांनुसार आता प्रत्येक परिमंडळाच्या महाव्यवस्थापकांना स्वत:चे ट्विटर अकाउंट सुरू करावे लागणार आहे. हे ट्विटर अकाउंट सर्व महाव्यवस्थापक स्वत: हाताळणार आहेत. प्रवाशांना कोणत्याही समस्या मांडायच्या असल्यास, प्रवासी या ट्विटर अकाउंटवर दाद मागू शकणार आहेत. तसेच महाव्यवस्थापकांना प्रवाशांच्या ट्विट्सना उत्तर द्यावे लागणार आहे. महाव्यवस्थापकांबरोबरच परिमंडळांमधील सर्व विभागांच्या रेल्वे व्यवस्थापकांनाही ट्विटर हँडल सुरू करावे लागणार आहे. विभागांतील समस्यांचे उत्तर रेल्वे व्यवस्थापकांनी देणे अपेक्षित आहे.
ट्विटर अकाउंटबरोबरच प्रत्येक विभागाला स्वत:चे फेसबुक पेजही सुरू करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पेजवरही प्रवासी आपल्या तक्रारी मांडू शकतील. या तक्रारींचे निवारण काही तासांतच करावे, असेही आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटवर आलेल्या तक्रारीही संबंधित रेल्वे विभागांच्या महाव्यवस्थापक तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठवण्यात येणार आहेत. या तक्रारींवरही तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असे आदेश या पत्रकात दिले आहेत. महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना फेसबुक व ट्विटर अकाउंट सुरू करण्याचे आदेश देण्यापेक्षा रेल्वे मंत्रालयाने त्यांना प्रवाशांशी आणि संघटनांशी संवाद साधण्यास सांगितले पाहिजे. अशा प्रकारे आभासी संवाद साधण्यापेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी समस्यांवर तोडगा शोधावा, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

First Published on July 21, 2015 7:01 am

Web Title: railway will connect to passengers by twitter facebook
टॅग Railway
Next Stories
1 बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढले
2 नव्या टीडीआर धोरणाविरुद्ध २४ हजार आक्षेप?
3 रद्दीतून शिक्षणाचा हक्क
Just Now!
X