रेल्वेच्या फूटबॉल संघात कर्मचारी नसलेल्या खेळाडूला सहभागी करून आणि रेल्वे पासचा गैरवापर केल्याचे स्पष्ट असताना रेल्वे प्रशासनाने थातूमातूर चौकशी करून हे प्रकरण फाईलबंद केले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा फूटबॉल संघ डेहराडून येथे आयोजित अखिल भारतीय जिप्सी गोल्ड फूटबॉल स्पर्धेत सहभागी झाला होता. रेल्वेचा संघ म्हटल्यावर संघातील सर्व खेळाडू रेल्वेचे कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु या स्पर्धेत रेल्वेकडून एका सहकारी बँकेचा चपऱ्याशी सहभागी झाला होता. डेहराडूनला नागपूरहून रवाना झालेल्या संघाच्या यादीत संबंधित कर्मचाऱ्यांचा विभाग आणि पद नमूद आहे. त्यात चक्क एक खेळाडू अर्बन बँकेत चपऱ्याशी पदावर कार्यरत असल्याचा उल्लेख आहे. शिवाय या कर्मचाऱ्याला रेल्वे पासने डेहराडूनला पाठविण्यात आले. हे देखील रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन आहे. रेल्वे पास अहस्तांतरणीय असून, तिचा गैरवापर झाल्यास तो गुन्हा ठरतो. रेल्वेतील क्रीडा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्या मर्जीतील लोकांना रेल्वे संघात खेळविण्याचा प्रकार लोकसत्ताने गेल्या ११ फेबुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केला होता. त्यानंतर विभागीय कार्मिक अधिकारी आर. गणेश यांच्यामार्फत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. आपण वस्तुस्थितीबद्दल माहिती सादर केल्याचे आर. गणेश यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. खेळाडूंच्या यादीत चक्क रेल्वेबाहेरील व्यक्ती असताना रेल्वे प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याचे टाळत आहेत. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अलोक कंसल यांनी लघुसंदेश तसेच दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
डेहराडूनच्या स्पर्धात सहभागी होण्यासाठी यासंदर्भातील परिपत्रक २२ जानेवारी २०१५ ला काढण्यात आले. ही स्पर्धा ५ ते १५ फेब्रुवारी या कालाधीत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नागपूरहून १७ जणांचा संघ पाठविण्यात आला. संघात सहभागी कर्मचाऱ्यांची ५ ते १४ फेब्रुवारी अशी दहा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आली.
या स्पर्धेसाठी अब्दुल खालिक, कमलजित शाहू, अरुण धुरिया, नितीन कुट्टलवार, अमित चौरासिया, अयाज अहमद, अमित अ‍ॅन्थोनी, मो. रिजवान, अफिक फराज अंसारी, तुशान जगदीश हरडे, सी. साईकुमार, मो. अजाज, रितेश इनुमुला, साजिद अनवर, शक्तीसिंग ठाकूर, ओवाईस खान, विश्वजित डे (संघ प्रभारी) यांची विशेष रजा मंजूर करण्याचे पत्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे कार्मिक अधिकारी आणि क्रीडा अधिकारी आर.गणेश यांनी मंजूर केली आहे. रेल्वे प्रशानातील गलथानपणाचा कळस म्हणजे सी. साईकुमार (खेळाडू क्रमांक ११) हा अर्बन बँकेत चपराशी असल्याचे यादीत नमूद असताना रेल्वे अधिकारी आर. गणेश यांनी त्याचीही विशेष रजा मंजूर केली आहे. यातील आणखी संतापजनक बाब म्हणजे संघाचे प्रभारी विश्वजित डे यांच्या नावाने रेल्वेचा समूह पास न करता खेळाडू क्रमांक अमित अ‍ॅन्थोनी यांच्या नावाने रेल्वे पास तयार करण्यात आला होता.

विभागीय व्यवस्थापकांनी या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची होती. आपण प्रकरणातील वस्तुस्थितीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यापुढे आपण काही सांगू शकत नाही.
आर. गणेश, विभागीय कार्मिक अधिकारी, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर.