गेल्या चार-पाच दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वरुणराजाचे सोलापूर व जिल्ह्य़ात पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी शहर व परिसरात आकाशात ढगांची गर्दी झाल्यानंतर थोडय़ाच वेळात पावसाला प्रारंभ झाला. हलका व मध्यम स्वरूपाच्या या पावसाने सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली होती.
दुपारी काहीसा उकाडा जाणवत असताना सायंकाळी पाचनंतर मात्र आकाशात ढग दाटून आले. त्यातून वरूणराजाच्या आगमनाची चाहूल लागली. त्यानुसार थोडय़ाच वेळात प्रत्यक्षात पावसाला सुरूवात झाली. बराचवेळ हा पाऊस पडत होता. भर पावसातच शाळा सुटल्याने घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली. अंगावर पाऊस झेलत व चिंब भिजण्याचा आनंद लुटत विद्यार्थी मुले-मुली घरची वाट धरताना दिसत होते.
जिल्ह्य़ात बुधवारी सकाळपर्यंत ३.०८ मिमी सरासरीने ३३.९० मिमी पाऊस झाला. यात करमाळा (१३), मंगळवेढा (७), सांगोला (६), माळशिरस (४), अक्कलकोट (२) आदी भागात कमी व हलका पाऊस झाला. बार्शी, माढा परिसरात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून आले.