गेल्या आठ दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने सोलापूर शहर व जिल्हय़ात काल मंगळवारी व दुसऱ्या दिवशी बुधवारी हजेरी लावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सारे रस्ते जलमय झाले होते. वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
दरम्यान, यंदाच्या पावसाळय़ात आतापर्यंत सरासरी १११.८१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८९.२७ मिमी इतकाच पाऊस झाला. पावसाची सरासरी ओलांडता न आल्याने दुष्काळग्रस्त जिल्हय़ातील जनतेची चिंता कायम आहे. संपूर्ण पावसाळय़ात पडणाऱ्या एकूण पावसापैकी आतापर्यंत केवळ १८.२६ टक्के इतकाच पाऊस पडल्याचे दिसून येते. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी ४.९९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक २१.५९ मिमी पाऊस बार्शीत पडला. या ठिकाणी पावसाची स्थिती जेमतेम असून यंदा आतापर्यंत १२५ सरासरीने पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७१.२१ मिमी इतकाच पाऊस होऊ शकला. त्यात आज पडलेला पाऊस सर्वाच्या आशा पल्लवित करणारा ठरला. उत्तर सोलापूर (४.१२), पंढरपूर (६.८१), माढा (७.९४), करमाळा (३.३८), माळशिरस (३.४०), मोहोळ (२.७८), अक्कलकोट (१.११) व दक्षिण सोलापूर (१.७४) याप्रमाणे कमीजास्त प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. सांगोल्यात मात्र पावसाने दडी मारल्याने तेथील दुष्काळाची परिस्थिती कायम आहे.