मृग नक्षत्र सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी पाऊस न आल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच छत्री, रेनकोट, मेनकापड, पावसाळी पादत्राणांचे विक्रेते, सीट कव्हर, पत्रे कारागीर इतर व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या व्यावसायिकांची अद्याप ‘बोहणी’ही झाली नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
सध्या पावसाळय़ाचे दिवस आहेत. मृग नक्षत्रात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. साधारणत: दरवेळी मान्सून सुरू होण्याच्या आधी एखादा वाळीवाचा पाऊस पडत असतो. मात्र, यावर्षी मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरही पाऊस येण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. उलट प्रखर उन्ह आणि दमट वातावरणामुळे उकाडा जास्त वाढला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत अनेक छत्री, रेनकोट विक्रेत्यांनी दुकानात माल भरून ठेवला आहे. मृग नक्षत्रातील पहिला पाऊस पडला की छत्री, रेनकोट, मेनकापड आदी वस्तूंची विक्री सुरू होईल, असे दुकानदारांना वाटत होते, पण पाऊस नसल्यामुळे तेही चिंतित  आहेत. पावसाळा म्हणजे शेतकऱ्यांसह छत्री, रेनकोट, मेनकापड, पावसाळी पादत्राणे, पत्रे कारागीर इतर व्यावसायिकांचा सिझन असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विक्रेते आपापली दुकाने मालाने भरून सज्ज ठेवतात. पाऊस सुरू असताना विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी, कर्मचारी कार्यालयात जाण्यासाठी, शेतकरी शेतात जाण्यासाठी छत्री, रेनकोटचा वापर करतात. पावसाची रिपरिप, संततधार चालू असताना हा व्यवसाय तेजीत असतो. सामान्य नागरिक पावसाळा जवळ येताच घरावरील फुटक्या, गळक्या पत्रांवर मेनकापड अंथरतात. मेनकापडामुळे घर गळत नाही, िभती ओल्या होत नाहीत. त्यामुळे पावसाळय़ात मेनकापडाला चांगली मागणी असते. पादत्राणांचे व्यापारी आपल्या दुकानात पावसाळय़ात पावसाळी पादत्राणे भरून ठेवतात. महागडी पादत्राणे पावसाने खराब होतील म्हणून कित्येक जण पावसाळी, कमी किमतीची पादत्राणे वापरतात. पावसाळा चांगला असेल तर या विक्रेत्यांचा व्यवसाय चांगला बहरतो. त्याचप्रमाणे गोरगरीब नागरिक पत्र्याचे छोटे डबे, डांबराच्या टाक्या आदीपासून पत्रे कारागिरांकडून पत्रे तयार करून घेतात. छतावरून, पत्र्यावरून पडणारे पावसाचे पाणी घराच्या एका बाजूला काढण्यासाठी ‘पन्हाळे’ तयार करून घेतले जाते. त्यामुळे पावसाळय़ात पत्रे कारागिरांना चांगले काम लागते. मिळकत बऱ्यापैकी होते. मात्र यंदा पावसाळय़ाला सुरुवात होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने छत्री, रेनकोट, मेनकापड, पादत्राणे, पत्र कारागीर इतर व्यावसायिक अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांप्रमाणेच ते पावसाच्या व ग्राहकांच्या  प्रतीक्षेत आहेत.

पावसाळ्यापूर्वी अनेक भागात छत्री दुरुस्त करणारे फिरत होते. मात्र, ही संख्या कमी झाली आहे. इतवारी येथील मेनकापड, रेनकोट व छत्रीची विक्री करणारे हसनभाई यांनी संगितले की, पाऊस नसल्यामुळे खरेदी होत नाही. आतापर्यंत पाच हजार रुपयांच्याही मालाची विक्री झालेली नाही. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ग्राहक दुकानाकडे फिरकत नाही. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी पाऊस पडला होता त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ५० हजार रुपयांची विक्री केली होती. हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याचे हसनभाई यांनी सांगितले. सीताबर्डी येथील छातावाला दुकानाचे मालक अजय चौरसिया यांनी सांगितले, यावर्षी छत्र्या व रेनकोटमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत, पण पाऊस नसल्यामुळे ग्राहक दुकानाकडे फिरकत नाही. पाऊस आला तर व्यवसायाला चांगले दिवस येईल.