धुवाधार पावसात भिजत डोंगरांचा माथा गाठणे, भाजलेल्या कणसांचा भुट्टा चवीने चाखणे, बहरलेल्या फुलांच्या ताटव्यासमोर मनसोक्त फोटो शूट, साहसी खेळांचा थरार, निसर्ग भ्रमण आणि पाण्याचे तुषार उडवणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त भिजणे..असे मनसुबे कॉलेज तरुण, हौशी पर्यटकांनी पावसाळ्यापूर्वीच बांधले होते. मात्र यंदा एका दिवसांची हजेरी लावून पाऊस महिनाभर गायब झाला. पावसाच्या या दडीने पर्यटनाच्या मनसुब्यावर पाणी पडले असून जूनमधील सर्व ‘वीकेंड’ पूर्णपणे वाया गेल्याने तरुणांचा हिरमोड झाला आहे. याचा फटका पर्यटनस्थळी छोटे व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनाही बसला आहे. माथेरान, नेरळ, जुम्मापट्टी, भिवपुरी, कर्जत, टिटवाळा, तानसा, भातसा आदी ठिकाणी पावसाळ्यात मोठय़ा संख्येने पर्यटक जातात. ग्रामीण भागातील निसर्गाच्या ओढीने पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात तरुणाई या भागाकडे ओढली जाते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातून या भागांमध्ये ‘वीकेंड’ साजरा करण्यासाठी जणू झुंबड उडते. सकाळी मुंबईकडून या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाडय़ा याच हौशी पर्यटक असलेल्या तरुणांच्या गर्दीने भरलेल्या असतात. दरवर्षी जूनमध्ये दिसणारे हे चित्र आता जुलै उजाडला तरी दिसून येत नाही. पाऊस नसल्याने या भागामध्ये धबधबे सुरू होऊ शकले नाहीत आणि त्यामुळेच या भागाकडे पावसाळ्यात येणाऱ्या हौशी पर्यटकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. पावसाळ्यात साहसी क्रीडा प्रकारांनाही मोठा प्रतिसाद मिळत असतो. जूनमध्ये एक ते दोन शिबिरे नक्की होत असतात. यंदा मात्र या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांचे एकही पावसाळी शिबीर होऊ शकलेले नाही. त्यामुळे पावसाळी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांमध्येही मंदीच आहे. आता पाऊस पडण्यास सुरुवात झाली असली तरी धबधबे खुले झाल्याशिवाय पर्यटनाला जाण्यामध्ये कोणताच आनंद नाही. त्यामुळे पावसाळी सहलींचा मोसम सुरू होण्यासाठी अजून आठवडाभराची वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती अ‍ॅडव्हेंचर इंडिया संस्थेचे मंगेश कोयंडे यांनी दिले.
छोटय़ा व्यवसायांना फटका..
पर्यटकांच्या मोठय़ा संख्येमुळे या भागातील छोटय़ा व्यावसायांना पावसाळ्यात सुगीचे दिवस येत असतात. हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, मक्याच्या भुट्टय़ाची विक्री, रानभाज्यांची विक्री, फळव्यवसाय, माथेरानमध्ये घोडय़ांची रपेट अशा प्रकारच्या स्थानिक व्यावसायिकांना पावसाळ्यात मागणी असते. मोठय़ा संख्येने येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असलेले हे व्यवसाय यंदा मात्र पावसाच्या दडीमुळे मंदीच्या खाईत लोटले गेले होते. नेरळला राहणारे वारकू कराळे या भागात येणाऱ्या पर्यटकांना जेवणाची सुविधा पुरवत असतात. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये त्यांचा हा व्यवसाय चालतो. मात्र धबधबे खुले झालेले नसल्याने या भागात पर्यटकांची अजून पाठच आहे.