जवळपास अडीच दिवस पावसाची रिपरिप सुरू असून समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भीज पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
या वर्षीच्या हंगामात अजून तरी मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे ओढे, नाले पाण्याने भरून वाहिले नाहीत. खरीप पेरण्या पूर्ण होतील की नाही, अशी पावसाने सुरुवातीला उघडीप दिल्यामुळे शंका निर्माण झाली होती. जिल्हय़ात दोन टप्प्यांत खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. दोन्ही टप्प्यांतील पिकांना गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे जीवदान मिळाले. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यास शेतकरी आंतरमशागतीसाठी सज्ज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शनही घडले नाही. रात्रंदिवस संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी २९.७९ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हय़ाची पावसाची सरासरी २४४.९८ मिमीपर्यंत पोहोचली आहे. जिल्हय़ात तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे- लातूर २७ (२१८.८४), औसा १७.४३ (१७६.७३), रेणापूर २६.७५ (२३१.२५), उदगीर ३३.२९ (२६९.८४), अहमदपूर २१.१७ (२८७.०३), चाकूर २७.२० (२३५.२०), जळकोट २९ (२८९.५०), निलंगा २९.३८ (२४४.१८),  देवणी ४५.६७ (२८०.९८), शिरूर अनंतपाळ ४१ (२२१.३४).
दमदार पावसामुळे नांदेडकर आनंदले
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने नांदेडकरांची तबियत दमदार आगमनाने खूश करून टाकली. सर्वदूर पडलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला.
जिल्ह्यात जुलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात पाऊस पडतो, असा इतिहास आहे. यंदा मान्सूनचे जूनमध्ये आगमन झाले खरे. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती. पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कमी-अधिक प्रमाणात सुरुच होता. सकाळी सूर्यदर्शनही घडले नाही.
जालन्यात सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढले
जिल्ह्य़ात शुक्रवापर्यंत सरासरी २३०.६६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३१२ मिमी पाऊस जाफराबाद तालुक्यात, तर सर्वात कमी १२९.४५ मिमी पाऊस घनसावंगी तालुक्यात झाला.
अन्य तालुक्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे – जालना २९२.३२, भोकरदन २२९.५८, बदनापूर १८१.४, परतूर २७६.२, अंबड २००.१ व मंठा २२४.२५. या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्य़ातील ९३ टक्क्य़ांपेक्षा अधिक खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत ५२ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर असून प्रत्यक्षात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून ३८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आले आहे. कापसाखाली २ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र असून ते या पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राएवढेच आहे. ज्वारी व बाजरीची पेरणी मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३० टक्क्य़ांच्या आत झाली आहे.
बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरू झाली असून, सलग दुसऱ्या दिवशी सूर्यदर्शन घडले नाही. हलक्या व रिपरिप पावसाने शेतीतली कामे खोळंबली असून खरीप पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. जिल्हय़ात आतापर्यंत १९३ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, मोठय़ा पावसाची गरज कायम आहे. मागील २४ तासांत ३.६६ मिमी पाऊस झाला. मात्र, पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यांत मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
दिवसभर रिपरिप, सरीवर सरी
गुरुवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने आजदेखील मुक्काम ठोकला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी दिवसभर बरसत होत्या. तसा त्यात जोर नव्हता. मात्र, दिवसाचा एकही क्षण असा नव्हता की, पाऊस थांबला. क्षणभराची विश्रांती घेतल्यासारखे वातावरण निर्माण होई. पण लगेच रिमझिम सुरू. औरंगाबाद शहरातच नाही, तर जिल्ह्य़ात सर्वदूर रिमझिम पावसाने ठाण मांडले. एवढे की, गुरुवारपासून सूर्यदर्शन झाले नाही.
शुक्रवारची सुरुवात पावसानेच झाली. सूर्य ढगांच्या आडच राहिला. दिवसभर सुरू असणाऱ्या रिमझिम पावसामुळे जनजीवन काहीअंशी का असेना विस्कळीत झाले. आज दिवसभर रेनकोट, छत्र्यांशिवाय बाहेर पडणेच मुश्किल झाले. रिमझिम पावसामुळेही काही सखल भागात पाणी साठले. रस्त्याच्या बाजूची माती रस्त्यावर आली. काही भागात तर अक्षरश: चिखल झाला. भाजीमंडईची अवस्था दयनीय झाली. भिजलेल्या व सडलेल्या भाज्या काहींनी रस्त्यावरच टाकल्या होत्या. काही भागात रस्त्यावर गटारीचे पाणी आले होते. सूर्यदर्शन नसल्याने वातावरणात जंतूदोष वाढला. गेल्या दोन दिवसांपासून सर्दी, पडसं, थंडी-ताप व खोकल्यांमुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांतील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे एकूण पावसाचे सर्व आकेड मि.मी.मध्ये- औरंगाबाद २(२०२.५०), फुलंब्री ९.३० (१८९.१०), पैठण .३० (१३४.१०), सिल्लोड १०.५ (२३८.२५), सोयगाव १० (२८९.४०), कन्नड ७.७२ (१९७.१८), वैजापूर ०.५० (१५२.२०), गंगापूर १.१० (१३४.४१), खुलताबाद ३.७० (१७३.१०).