जवळपास दीड महिना प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाचे बुधवारी रिमझीम स्वरूपात का होईना, जिल्ह्यातील बहुतांश भागात आगमन झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे संकट भयावह स्वरूप धारण करण्याच्या मार्गावर असल्याने दमदार पावसाची सर्वाना अपेक्षा आहे. मागील पाच ते सहा दिवसांत आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाची नेपथ्य रचना व्हायची. पण, काही केल्या तो बरसत नव्हता. ऊन-सावलीच्या या खेळाला रिमझीम पावसाने विराम दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस अन् गारपिटीचा सामना करणाऱ्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. एरवी, जूनमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनने यंदा जुलैच्या मध्यापर्यंत सर्वाना प्रतीक्षा करायला लावली. या वर्षी आतापर्यंत केवळ ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हे प्रमाण २९२ मिलीमीटर होते. पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये टंचाईच्या संकटाने बिकट स्वरूप धारण केले आहे. पावसाअभावी पेरणीची कामे रखडून पडली. या एकूणच परिस्थितीत बुधवारी काही भागात रिमझिम तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वाना दिलासा मिळाला. सकाळपासून बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा फारसा जोर नसला तरी इतके दिवस पावसाविना राहिलेल्या प्रत्येकाला त्याचे अप्रूप वाटत होते. या पावसात काहींनी भिजण्याचा प्रथमच मनसोक्त आनंद लुटला तर काही जणांची तारांबळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. साधारणत: तासभर ही रिपरिप सुरू होती. रस्ते भिजण्यापलीकडे त्याने काही साध्य झाले नसले तरी तो आल्याची वर्दी मिळाली.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणारा इगतपुरी तालुका जुलैच्या मध्यापर्यंत कोरडा राहिला होता. पण, या भागात पावसाचे आगमन झाले आहे. इगतपुरी शहर, घोटी, भावली, दारणा धरण परिसरात पाऊस जोर धरत आहे. यामुळे भावली व दारणा धरणाच्या जलसाठय़ात अल्पशी वाढ झाल्याची माहिती शाखा अभियंता एस. के. मिसाळ यांनी दिली.
दिंडोरीचा पश्चिम पट्टा, वणी, निफाड तालुक्यातील पिंपळगाव व इतर भाग आदी भागांत पावसाचे आगमन झाले. काही भागात त्याचे स्वरूप रिमझीम असले तरी काही भागात मात्र चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील इतर भागातही त्याने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पुढील दोन ते तीन दिवस त्याने जोर पकडल्यास रेंगाळलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात करता येईल, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. सलग दोन ते तीन दिवस पाऊस झाल्यास शहरावरील पाणी टंचाईचे संकट दूर सारले, जाईल अशी शहरवासीयांची भावना आहे.