विजेचा कडकडाट.. ढगांचा गडगडाट.. जोरदार वादळी वाऱ्यासह काल गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे एका शेडचे पत्रे उडून झालेल्या दुर्घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक गावातील घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर सहा जनावरे दगावली. कालच्या अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे.
ढालेगाव फाटय़ावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल िशदे यांच्या दुकानासमोरील पत्र्याचे शेड उडाले व या दुर्घटनेत पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला उभ्या असलेल्या शेख अन्सर शेख महेबुब (पाथरी) व सागर मालानी (माजलगाव) हे दोघे मृत पावले. या घटनेत इतर काही लोक जखमी झाले आहेत. आज घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ.शालिग्राम वानखेडे, आ.मीरा रेंगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, तहसीलदार देविदास गाडे यांनी भेट दिली. मयताच्या नातेवाइकांना आपत्कालीन मदत केली जाईल, असे आश्वासन या वेळी डॉ.वानखेडे यांनी दिले.
काल गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असले, तरी उकाडय़ात वाढ झाली होती. दुपारनंतर सेलू, पाथरी, जिंतूर व पूर्णा तालुक्यात काही ठिकाणी पावसाने शिडकावा केला. पाथरी तालुक्यातील बाभळगाव, उमरा, अंधापुरी या गावच्या शिवारात गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे दुपारपासूनच ग्रामीण भागातील वीज नाहीशी झाली होती. सायंकाळी सातनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात काळ्याकुट्ट ढगाची जमवाजमव सुरू झाली व अचानकपणे जोराचे वादळीवारे वाहू लागले. थोडय़ाच वेळात विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाटाच्या आवाजात पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे पुन्हा सातनंतर शहरी व ग्रामीण भागातील वीज गेली. काही गावात विजेच्या तारा तुटल्याने आज शुक्रवारी दुपापर्यंत वीजपुरवठा खंडित होता.
परभणी शहरातील काही भागात मध्यरात्रीपर्यंत वीज नव्हती. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. तर घरावरचे पत्रे उडाले. िपगळी, दैठणा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले होते. काही ठिकाणी ओढय़ा-नाल्यांतून थोडेफार पाणी वाहिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील पालम व जिंतुर तालुका वगळता वादळ-वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. सेलू तालुक्यातील जीवाजी जवळा येथील वाऱ्यामुळे वीजतारा तुटल्या. या तारांचा धक्का लागल्याने पंढरीनाथ भुजबळ यांची एक गाय व एक बल, दत्ता खरात यांची गाय व शिवाजी भुजबळ यांची गाय मृत्युमुखी पडली. तर दत्ता खरातही यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. सेलू शहराचा वीजतारा तुटल्याने गुरुवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. पाथरी येथील १३२ के.व्ही.तून सेलूला वीजपुरवठा करण्यात येतो. पूर्णा तालुक्यातील आलेगाव येथील सटवाजी किशन सौराते यांच्या आखाडय़ावरील बांधलेल्या दोन गाईंवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.